नगर – कोपर्डी येथील निर्भयाच्या अत्याचार व खून प्रकरणातील नराधमांना फासावर लटकवेपर्यंत खटला चालवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सोमवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांना याबाबत मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
कोपर्डी येथील घटनेला दोन वर्षे लोटून गेली तरीही या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावूनही अद्यापि फासावर लटकवण्यात आले नाही. फाशीच्या शिक्षेविरोधात या आरोपींनी औरंगाबाद उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे निर्भयाला न्याय मिळण्यास विलंब लागत असून मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
या नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी उच्च न्यायालयात खटला चालवून निर्भयाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने उज्ज्वल निकम यांच्याकडे केली.
परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनादरम्यान आणि ९ ऑगस्ट रोजी राज्यभर झालेल्या आंदोलनात मराठा बांधवांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत निकम यांनी कायदेशीर मार्गदर्शन करून आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य सरकारसोबत चर्चा करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.