मुंबई: पुण्यासारख्या शहरांत घर किंवा गाडी भाड्यावर घेणारे अनेक असतील.पण या शहरांमध्ये चक्क बॉयफ्रेंड भाड्यावर मिळू शकतात हे सांगितल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु, कितीही अजब असले तरी हे सत्य आहे. ‘रेंट अ बॉयफ्रेन्ड टू क्युअर डिप्रेशन’ (RABF) या मोबाइल अॅपच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.
१५ ऑगस्टला लाँच झालेले हे अॅप केवळ आपल्याला योग्य जोडीदार मिळावा म्हणून बनवण्यात आलं नसून तरुणाईतील वाढत्या नैराश्याचे प्रमाण लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. नैराश्यात असणाऱ्या व्यक्तींना एकटेपणाची भावना सतावत असते. त्यांना मन मोकळं करण्यासाठी हक्काची जागा मिळावी.
आपल्या या नव्या व्यवसायाबाबत कौशल म्हणतो, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे लोक वेगळे काही करत नसून केवळ आपले म्हणणे ऐकून घेतात. आपण स्वत:ही ३ वर्षे नैराश्यात होतो, त्यामुळे आपल्याला ही संकल्पना सुचली असे तो सांगतो. कौशल पेशाने इंटेरियर डेकोरेटर असून त्याने आपली ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यामध्ये ग्राहकांना ६ हॅंडसम मुलांचा पर्याय देण्यात आला असून त्यातील एका मुलाची निवड करता येईल. आपले मन मोकळे करण्यासाठी या मुलांसोबत वेळ घालवणे हा चांगला पर्याय ठरु शकतो असे त्याचे म्हणणे आहे. या मित्रासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता, जेवायला जाऊ शकता. ही मुले २२ ते २५ या वयोगटातील आहेत. यामध्येही सेलिब्रिटी हवा असल्यास तासाला ३ हजार रुपये, मॉडेलसाठी २ हजार रुपये आणि सामान्य व्यक्ती हवा असल्यास तासाला ३०० ते ४०० रुपये असा दर आकारण्यात येणार आहे.
सध्या ही सुविधा केवळ मुंबई आणि पुण्यात सुरु करण्यात आली असून येत्या काळात तिचा इतर शहरांत विस्तार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. याबरोबरच टोलफ्री क्रमांकाची सुविधाही देण्यात आली असून तुम्हाला फोनवर संवाद साधायचा असल्यास १५ ते २० मिनीटासाठी ५०० रुपये भरावे लागतील. हा उपाय मानसिक संतुलन मिळविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे कौशल याचे म्हणणे आहे.