जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताची फुलराणी साईना नेहवालने बॅडमिंटन कांस्यपदक जिंकून चांगली सुरवात करुन दिली आहे. जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम स्थानावर असणाऱ्या ताई त्झु यिंग हिने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत साईनाचा २१-१७, २१-१४ अशा सरळ गेममध्ये पराभव करून साईनाला धक्का दिला. साईनाने सामन्यात परतीचा प्रयत्न केला, पण तिला फारशी चमक दाखवता आली नाही. पराभवानंतरही साईनाची कामगिरी ऐतिहासिक ठरली. बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी ती पहिलीच महिला ठरली.
भारत आज विविध क्रीडा प्रकारांत पदकांसाठी खेळणार आहे. रविवारी मिळविलेल्या पाच रौप्य आणि दोन कांस्यपदकांनंतर आजचा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सध्या भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, १० रौप्य, १९ कांस्य पदकांसह एकूण ३६ पदके जमा आहेत. पदकतालिकेत भारत नवव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा : झूलन गोस्वामी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त