मुंबई- राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१८ या काळात स्वच्छ भारत पंधरवडा राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात येणार आहे. शाळा, शाळांचा परिसर आणि घरांमध्ये स्वच्छता व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करून, स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतींचा वापर करण्यास शाळकरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे.
सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी या पंधरवड्यातील पहिल्याच आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ किंवा पालक आणि शिक्षकांमध्ये या उद्देशासाठी बैठका आयोजित करणे अपेक्षित आहे. शिक्षकांनी शाळांतील, शैक्षणिक संस्थांमधील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास अशा सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रस्ताव योजना तयार करावी, तसेच या विषयावर विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित कराव्यात असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या निर्णयात नमूद आहे.
या कामासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्यावी. शाळा व शिक्षण संस्थांमध्ये या पंधरवड्यात राबविण्यात आलेले विविध उपक्रम केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या शगुन पोर्टलवर अपलोड करण्यात यावे असे शालेय शिक्षण विभागाच्या यासंबंधीच्या निर्णयात म्हटले आहे.
मोडके फर्निचर, जुन्या फायली फेका
अनेक शाळा व शैक्षणिक संस्थांच्या संकुलात अडगळ ठरत असलेल्या जुन्या अभिलेखांची नोंदणी करून अनावश्यक असलेली कागदपत्रे काढून टाकावीत. नियमानुसार जुन्या फायलींचे दफ्तरही कमी करण्याचा प्रयत्न करावा अथवा गरज नसेल तर निष्कासित करावे, शाळा अथवा शाळेचे आवारात, शैक्षणिक संस्थेतील सर्व टाकाऊ सामान निष्कासित करावे. मोडके फर्निचर, निरुपयोगी उपकरणे आणि नादुरुस्त वाहने नियमानुसार मोडीत काढावीत, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी जागृती निर्माण करण्याचे कामही या पंधरवड्यात करावे, असे सांगण्यात आले आहे.