राजकीय विचारधारांची लढाई केवळ विचारांनीच नव्हे, तर सभ्य, शालीन, सौहार्दशील व विवेकी विचारांनी लढणारे स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील उत्तुंग व सर्वमान्य नेतृत्व, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात वयाच्या ९३व्या वर्षी देहावसान झाले.
राजकीय-सामाजिक विचारांच्या कल्लोळात, आपापल्या स्वतंत्र कोषात बंदिस्त करून घेतलेल्या परस्परविरोधी विचारधारांना एकत्र बांधण्याचे अफाट सामर्थ्य असलेल्या या जननायकाच्या निधनानंतर भारत देशातील उजवी-डावी-मध्य अशा सर्व दिशांतील तसेच विभिन्न रंगांतील विचारधारांनी एकसूरात शोक व्यक्त केला. वाजपेयी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने २२ ऑगस्टपर्यंत सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
सुमारे एक तपापूर्वी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्वीकारलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ११ जून रोजी ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर गुरुवारी रात्री वाजपेयी यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनियामुळे वाजपेयी यांच्या दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. याशिवाय दोन्ही किडन्या अशक्त झाल्या होत्या. परिणामी किडनीसह अनेक अवयव निकामी झाल्याने वाजपेयी यांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, असे ‘एम्स’ने जाहीर केले आणि अवघा देश शोकसागरात बुडाला.
वाजपेयी यांचे पार्थिव नवी दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अविवाहित असलेल्या वाजपेयी यांच्या मागे त्यांची मानसकन्या नमिता कौल भट्टाचार्य आहेत.
आज दुपारी अंत्यसंस्कार
अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आज, शुक्रवारी दुपारी ४ वाजता दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे अंत्यसंस्कार होतील. सकाळी साडेसात ते साडेआठपर्यंत वाजपेयी यांचे पार्थिव दिल्लीच्या कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सकाळी ९च्या सुमारास त्यांचे पार्थिव दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयात नेण्यात येईल. दुपारी १ वाजता मुख्यालयातून वाजपेयी यांचे पार्थिव स्मृतीस्थळ येथे आणण्यात येईल. राष्ट्रीय दुखवट्याचा भाग म्हणून तिरंगा अर्ध्यावर आणण्यात येणार आहे. याशिवाय आजच्या अंत्यसंस्कारानिमित्त केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात येणार आहे.
अधिक वाचा : माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन