अकोला, दि. 16 :– पातुर शहराच्या विकासासाठी शासनातर्फे भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असुन शहराच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.तेराव्या वित्त आयोगातंर्गत प्राप्त निधीतून नविन नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळा दि. 15 ऑगष्ट रोजी पातुर नगरपालिका येथे आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार बळीराम सिरस्कार , पातुरच्या नगराध्यक्षा प्रभाताई कोथळकर, उपाध्यक्ष राजू उगले, माजी आमदार जगन्नाथ ढोणे, स्थाई समितीचे सदस्य हाजी सैय्यद बुरहाण , मुख्य अधिकारी प्रमोद वानखडे, नगरसेविका वर्षा बघाडे, बांधकाम समितीचे सभापती एहफाजोद्दीन , आरोग्य सभापती तुळसाबाई गाडगे, नगरसेवीका हमीदाबी हुसैन शाह, तहसिलदार रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.
नगरपालिकेची सर्वांगसुंदर व सुसज्ज प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण झाले असुन यामुळे पातुर शहराच्या विकासात भर पडलेली आहे. असे सांगुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, मागील काही वर्षात महाराष्ट्रात शहरीकरण मोठया प्रमाणात झाले आहे. यामुळे शहरा लगतच्या भागातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी शहराच्या नगरपालिकांवर भार पडत आहे. पातुर शहराची हद्दवाढ व विकास आराखडा मागील काही वर्षापासुन झालेला नाही. याची दखल घेवून हद्दवाढ व विकास आराखडा बाबत लवकरच बैठक घेवून प्रश्न सोडविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पातुर शहरात अभ्यासिका , क्रिडांगण , सांस्कृतिक भवन, ग्रामीण रूग्णालय आदी कामे करण्यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या जाईल तसेच पातुर नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी असलेल्या विविध प्रकल्पांना मंजुरी दिल्या जाईल. असे त्यांनी सांगितले.
मागील काही महिन्यापासुन अकोला येथे दर पहिल्या व तिस-या सोमवारी भरविण्यात येणा-या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांच्या तक्रारींचे वेळीच निरासरण होत आहे. यामध्ये प्रशासनातील अधिकारी-यांची साथ मिळत असून जनतेचे प्रश्न त्वरीत सुटत असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.
आमदार गोपीकिशन बाजोरीया , आमदार बळीराम सिरस्कार, नगराध्यक्षा प्रभाताई कोथळकर यांनी पातुर शहराच्या समस्या पालकमंत्री यांच्या समोर मांडल्या. स्थायी समितीचे सदस्य हाजी सैय्यद बुरहाण ,यांनी प्रास्ताविकातून पातुर नगरपालिकेच्या कामकाजाची भुमिका विषद करुन नगरपालिकेच्या विकासासाठी भरीव निधीची मागणी केली. यावेळी नगरसेविका वर्षा बघाडे, शहाबाबू महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. इसाक राही, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री यांच्या जनता दरबारात तक्रार केल्यानंतर पालकमंत्री यांच्या पुढाकाराने सफी प्लॉट येथील नागरिकांना नळाव्दारे पाणी पुरवठा सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरीकांनी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा सत्कार केला. तसेच सफाई कामगार संघटनेतर्फे पालकमंत्री यांचा मोठया आकाराचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरपालिकेचे पदाधिकारी , नगरसेवक , कर्मचारी व शहरातील नागरीक उपस्थित होते. यावेळी नगरपालिकेच्या परिसरात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.