अकोला, दि. 16 :- सदर वर्ष विविध निवडणुकीचे वर्ष असल्या कारणाने निवडणूकीच्या आचारसंहिता मुळे कमी कालावधी मिळणार आहे. यासाठी जिल्हयातील विकासाची कामे संबधीत यंत्रणेने तात्काळ मार्गी लावावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेत.
आज दि. 16 ऑगस्ट 2018 रोजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यासभेला खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिपंळे, आमदार रणधिर सावरकर , जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव आस्तिक कुमार पाण्डेय , जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर, महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
प्रलंबीत असलेल्या कामाचे देयके काम पुर्णपणे झाल्याशिवाय देवू नये अशा सुचना पालकमंत्री यांनी दिल्यात. गौरक्षण रोडवरील बोटल नेकचे काम अतिक्रमण काढून त्वरीत करावे , कॅनल रोडचे 2 कोटीचे काम मार्गी लावावे त्यासाठी कोणाची काही हरकती किंवा सुचना असल्यास त्या मागुन घ्याव्यात. माता नगरच्या घरकुलाचे काम मार्गी लावा. प्रलंबीत विकास कामाच्या देयकाचे पैसे काम पुर्ण झाल्याशिवाय देण्यात येवू नये. अशा सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्यात.
पुढील काळात जिल्हा परिषद , लोकसभा निवडणूकीच्या आचार संहिता लागणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर पुर्वी कामाची नियोजन करून निधी खर्च करण्यासाठी कामाला सुरवात करणे आवश्यक असल्याचे सांगुन विभाग प्रमुखांनी तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी परिपुर्ण प्रस्ताव त्वरीत संबंधीताकडे सादर करावे . अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले त्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने आलेल्या अनुपालनाचे वाचन करून त्यावर सभागृहातील सदस्याशी चर्चा करण्यात आली.
महापौर विजय अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या मौजे निमकर्दा ते मोरगाव रस्त्यांचे कामाची तात्काळ निविदा काढून काम पुर्ण करण्याबाबतचा निर्देश कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी 9 ऑगष्ट रोजी झालेल्या मराठा आंदोलनामध्ये अकोट शहरातील काही व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत योग्य चौकशी करून कायदयाच्या चौकटीत राहुन कोणीही निरपराध व्यक्तीला त्रास होणार नाही याची दखल घेवून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देश दिलेत.
आमदार गोपीकिशन बाजोरीया यांनी भुमिगट गटार योजना, अमृत योजना अंतर्गत पाईपलाईन टाकणे , मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच गुंठ्ठेवारी कायदा रद्द करावा अशा सुचना केल्यात. यावर पालकमंत्री यांनी गुंठ्ठेवारी कायदाचा प्रश्न राज्यव्यापी असल्यामुळे याबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. नियोजन समितीच्या सदस्या जोस्ना चौरे यांनी जिल्हा परिषदेच्या काही शाळा अत्यंत शिकस्त झाल्या असुन त्यांची दुरूस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या 76 शाळा दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच 109 शाळा निर्लेखीत करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे असे सांगितले.
यावर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सदर कामासाठी जिल्हा नियोजन योजनेतुन जास्तीत जास्त निधी देण्यात येईल. काही शाळा सदयस्थितीत गावातील उपलब्ध असलेल्या जागेत स्थंलातरीत कराव्यात. परंतू शिक्षणाचा सर्वांना शिक्षण हा मुलभूत अधिकार असल्यामुळे कोणीही शिक्षणापासुन वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात.
माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी शाळापरिसरात रस्त्यांवर गतीरोधक टाकावे , महाजल योजना, घरकुल वाटप योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पिक विमा योजना याबाबतची चौकशी करावी अशी मागणी केली. यावर पालकमंत्री यांनी संबधीत विभागाला सुचना दिल्यात.
यावेळी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त , कपाशीचे संक्रमण , प्रधानमंत्री पिक विमा योजनेत डांळिब फळबाग पिकाचा समावेश , महिलासाठी शौचालय, पार्किंग, दौनद गावचा रस्ता , नगरपरिषद तेल्हाराच्या समस्या , मुख्यमंत्री ग्रामसडक योजना , मुर्तिजापुर येथील घरकुल योजना , मनात्री येथे दुषित पाणी पुरवठा , डाबकी रोडवरील पथदिवे , जिल्हा परिषदेच्या शाळेचे मनपाकडे हस्तांतरण , शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या पदोन्नती आदिंवर चर्चा यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केली.
शहरातील मनपा शाळांच्या परिसरात पार्किंग , सुलभ शौचालय, महिला बचत गट व विकलांगसाठी मॉल आदि बाबतची पडताळणी करून तसा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे मनपा आयुक्तांनी सादर करावा त्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्यात. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांनी केले. यावेळी माजी आमदार वंसतराव खोटरे , नियोजन समितीचे सदस्य अक्षय लहाने, प्रतिभा अवचार , राजेश खारोडे , डॉ. अशोक ओळंबे, हरिश अलिमचंदानी तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.