अकोला, दि. 15 – जिल्हयाची शैक्षणिक, सांस्कृतिक, औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती होत असून ही आपणा सर्वांसाठी आनंददायी बाब आहे, जिल्हयाच्या सर्व क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 9.05 वाजता पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, स्वातंत्र संग्राम सैनिक, अधिकारी /कर्मचारी, पत्रकार, नागरीक, विदयार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, जलसाठयांचे स्त्रोत बळकट करण्यासाठी तसेच पाणी टंचाईपासून मुक्ती करीता सुरु करण्यात आलेले महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्हयात अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीचे पुनरुज्जीवन व अकोला-अकोट तालुका आणि पी.के.व्ही मधील चार ते सहा एकर आकारमानाची शेततळी करण्यामध्ये अकोला जिल्हा अग्रेसर असून ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
महाराष्ट्र सावकारी कायदयान्वये, गरीब शेतक-यांची अवैध सावकारी कर्जातून बळकावलेली एकूण 25 प्रकरणांमधून 126 एकर 35 गुंठे इतकी शेत जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली आहे. तर डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत 96 हजार लाभार्थींना 14 कोटी 32 लाख रुपये एवढी रक्कम मंजुर करण्यात आली असून सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त दुधातून शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी विशेष प्रकल्पा अतंर्गत अकोला जिल्हयातील 114 गावांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारची एजन्सी अपेंडा व महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने अकोला जिल्हयाच्या इतिहासात प्रथमच शेतक-यांना शेतमाल निर्यात करण्याचा नवा स्त्रोत मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात केळी पीक करार व त्यानंतर मिरची, भेंडी या भाजीपाला वर्गीय पिकांच्या निर्यात करारामुळे शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि ग्राहकांच्या हिताकरीता जिल्हा प्रशासनाचा वावर हा महत्त्वाकांक्षी उपक्रमही अकोलेकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे, असे सांगून ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्राहकांना गुणवत्तापूर्ण ताजा शेतमाल स्वस्त दरात व शेतक-यांच्या शेतमालाला अधिक भाव वावरच्या माध्यमातून प्राप्त करुन दिला जाणार आहे.
अकोला जिल्हयाच्या इतिहासामध्ये प्रथमच जिल्हा प्रशासनाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे क्रांतिकारी क्रियान्वयन केले आहे. शेतकरी, शेतमजुर, व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे नावावर प्रत्येकी २२० रुपयांची कायमस्वरुपी ठेव जमा करण्यात आली असून त्यामुळे त्यांना आयुष्यभर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे कायम स्वरुपी संरक्षण प्राप्त होणार आहे.
मार्च 2018 पर्यंत प्रलंबित असलेल्या 2 हजार 503 कृषी पंपांना वीज जोडणी देण्याची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हयाला इंफ्रा 1, इंफ्रा 2,तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, कृषिपंप उर्जीकरण कार्यक्रमातंर्गत भरीव निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हयातील विद्युत ग्राहकांना व शेतक-यांना आवश्यक दाबाचा विद्युत पुरवठा करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आणि राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत 1 हजार 111 लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आतापर्यंत 1 हजार पेक्षा जास्त उमेदवारांना रोजगार मिळाला आहे. तर 81 उमेदवारांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. सद्यस्थितीत 2 हजार 490 उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, रमाई महिला सक्षमीकरण योजना व तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमा अंतर्गत 1 हजार 293 गटांना 19 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तर कृषी समृध्दी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा अंतर्गत 933 गटांना 12 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकोला ते खंडवा रेल्वे मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु झाले आहे.
मोर्णा रिव्हर फ्रंटडेव्हलपमेंट अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्यात आला असून नदी स्वच्छता प्रकल्पातंर्गत रुपये 394 कोटी निधी मागणीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी सुरु करण्यात आलेल्या जनता दरबारमुळे सामान्य नागरिकांच्या समस्या त्वरीत सुटण्यास मदत झाली आहे.
अकोला शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने शहरातील विकास कामे प्रगतीपथावर आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना आता चांगल्या उपचारांच्या सुविधा मिळण्याबरोबरच औषधेही तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतील. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आतापर्यंत जिल्हयातील 12 रुग्णालयांत 32 हजार 334 लक्ष रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलही लवकरच जनतेच्या सेवेत उपलब्ध होणार असून प्रथमच अकोला जिल्हयातील गरीब, वंचीत आणि सामान्य नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळणार आहे. महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांच्या उत्तम स्वास्थ्याकरिता कटीबध्द आहे, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत अकोला जिल्हयातील सर्व शाळांतून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यात येत आहे.तसेच जिल्हयातील महिला, मुली व युवतींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जननी-2 हा कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यात आला.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती महाविदयालयातील युवकांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविण्यासाठी ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आजपासून राबविण्यात येणार आहे, या उपक्रमात जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केले.
यावेळी विविध परिक्षेतील गुणवंत विदयार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मोर्णा व वावर या उपक्रमाची उत्कृष्ट चित्रफित तयार केल्याबददल जिल्हा माहिती कार्यालयाचे कॅमेरामन चंद्रकांत पाटील व जिल्हा हेल्प डेक्सचे प्रसाद रानडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती महाविदयालयातील युवकांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या लोगोचे विमोचनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून त्यांची आस्थेने चौकशी केली. यानंतर उन्नत शेती समृध्द शेतकरी योजनेतंर्गत निराट येथील राधाकृष्ण नागोराव म्हैसणे आणि दहीगाव येथील लता विजय भदे यांना पालकमंत्री यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे हस्तांतरण करण्यात आले.
अधिक वाचा : तेल्हारा येथे स्वातंत्र्य दिनी गेल्या अठरा वर्षा पासून होत आहे रक्तदान,प्रहार संघटनेचा उपक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola