पुणे: पुण्यातील गणेश खिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हर हॅक करून अनेक खातेधारकांच्या डेबिट कार्ड आणि रुपी कार्डाची ची माहिती चोरण्याचा घटना घडली आहे.त्यातून तब्बल ९४ कोटी रुपये हॉंगकॉंग येथील बँकेत ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
चतु:श्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेचे गणेशखिंड रोडवर कॉसमॉस टॉवर येथे मुख्यालय आहे. तेथे असलेल्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर कोणीतरी मालवेअरचा हल्ला करुन बँकेच्या काही व्हिसा व रुपी डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे व्हिसाचे अंदाजे १२ हजार व्यवहार केले. याद्वारे ७८ कोटी रुपयांचे व्यवहार भारताबाहेर झाले आहेत. तसेच रुपे कार्डचे २ हजार ८४९ व्यवहारांद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे भारताबाहेर गेले आहेत. असे एकूण १४ हजार ८४९ व्यवहारांसाठी ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व एनपीसीआय यांना कॉसमॉस बँकेने मान्यता दिल्याचे भासवून कोणी तरी त्या अप्रुव्ह केल्याचे भासवून त्याद्वारे ८० कोटी रुपये काढून घेतले होते. हे सर्व व्यवहार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत घडले.
त्यानंतर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅकरने स्विफ्ट ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व इनिशिएट करुन हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या एएलएम ट्रेडिंग लिमिटेड यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले. अशा प्रकारे हॅकरने तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा कॉसमॉस बँकेला गंडा घातला असून या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.