अकोला दि. 12 – मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज शहरातील शासकीय अध्यापक महाविदयालाच्या वसतिगृहाची पाहणी केली. सर्व बाबींनी सुसज्ज असलेले हे वसतिगृह मराठा समाजाच्या विदयार्थी आणि विदयार्थींनीसाठी दि. 15 ऑगस्ट 2018 रोजी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यादृष्टीने याच दिवशी वसतिगृहाचे उदघाटन केले जाईल, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहाण, तहसिलदार विजय लोखंडे, शासकीय अध्यापक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मानेकर, मराठा संघ संघाचे अविनाश पाटील ताकट, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अशोक पटोकार, यासह पंकज जायले डॉ. अभय पाटील यांची उपस्थित होती.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यात वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सर्व सुविधायुक्त हे वसतिगृह राहणार आहे. त्यामुळे प्रमुख शहरात राहून शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. नवीन वसतिगृहाचे बांधकाम होईपर्यंत शासकीय अध्यापक महाविदयालयातील वसतीगृह मराठा समाजातील विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्याचे रितसर उदघाटन 15 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. विदयार्थ्यांना राहण्याच्या सोईबरोबरच या ठिकाणी स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परिक्षा केंद्र, वाचनालय तसेच जिमची व्यवस्था जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्ण योजनेतून करुन देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
अधिक वाचा – अकोट नगर पालीकेचा भोंगळ कारभार अकोट शहरातील पथंदिवे 8 दिवसापासुन 24 तास दिवस राञ चालुच ..?
विविध योजनांच्या प्रचारासाठी 18 ऑगस्ट रोजी भव्य कार्यशाळा
तरूण-तरुणींना विविध व्यवसाय – उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 10 लाख रूपयांपर्यंतच्या कर्जास शासनाने हमी दिली असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले, या कर्जाचे व्याज शासनामार्फत भरले जाणार असल्याने आता तरुणांना बँकांमार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध होईल, याच लाभ तरुणांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा जास्तीत जास्त प्रचार होण्याकरीता दि. 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस मोठया संख्येने विदयार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या मुलींच्या वसतिगृहाला भेट
मराठा सेवा संघाच्यावतीने मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या शहरातील वसतिगृहालाही पालकमंत्री यांनी आज भेट दिली. या वसतिगृहाची पाहणी करुन तेथे राहणाऱ्या मुलींची त्यांनी सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. यावेळी पूनमताई पारस्कर यांनी माहिती दिली. मराठा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हयातील कायदा व सुवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीसांनी सतर्क राहावे, अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, मराठा आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्याची चौकशी करुन त्यांचे गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र जे खरोखरच गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कार्यवाई केली जाईल. जिल्हयात शांतता कायम ठेवण्यासाठी लोकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शासकीय विश्रामगृहाच्या व्यवस्थेची चौकशी
येथील शासकीय विश्रामगृहाच्या संपूर्ण व्यवस्थेची पालकमंत्री यांनी चौकशी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांनी त्यांना माहिती दिली. सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या विश्रामगृहात कुठलेही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, नियमानुसारच विश्रामगृहाचे कामकाज असावे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, परिसराचे सुशोभिकरण करावे. सर्व प्रकारचे रजिस्टर अदयावत ठेवावेत. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाई करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.