औरंगाबाद: राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे. जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, अशा आंदोलनात आगीत तेल ओतण्याचें काम जबाबदार पक्षांनी करु नये, असेही गडकरी यांनी आवाहन केले. तसेच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वाट काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील मोठा मंत्री पहिल्यांदाच बोलल्याने गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन आता चर्चेला सुरुवात झाली.
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. औरंगबाद, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळणही लागले होते. तसेच आंदोलनाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांचा राज्य सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवले जाईल. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिले आहे.
अधिक वाचा : नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची प्रक्रीया पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola