अकोला: शिवभक्तांसाठी महत्त्वाची असणारी कावड यात्रा 13 ऑगस्ट 2018 पासून सुरु होत आहे, ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी राजराजेश्वर मंदिरापासुन ते गांधीग्राम पर्यंतच्या कावड यात्रा मार्गाची पाहणी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान , उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उप कार्यकारी अभियंता राम पटोकार, तहसिलदार विजय लोखंडे व राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता श्री. जोशी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा-या कंत्राटदाराचे अभियंता व प्रतिनिधी उपस्थित होते.
दि. 12 ऑगस्ट पासून श्रावण महिन्यास सुरुवात होणार आहे. या महिन्यात येणाऱ्या दर सोमवारी मोठया प्रमाणात जिल्हयातील शिवभक्त कावड पालखीव्दारे गांधीग्राम येथून पुर्णा नदीचे पाणी घेवुन येतात व अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिर येथे जलाभिषेक करतात. सदर अकोला –अकोट राष्ट्रीय मार्गावरील रस्त्यांचे चौपदरी करण्याचे काम सध्या सुरु आहे. तर शहरातील मार्गावर अनेक ठिकाणी दुरस्तीची कामे सुरु आहेत.
अकोला –अकोट राष्ट्रीय मार्गावरील रस्त्यांचे चौपदरी करण्याच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी जिल्हाधिकारी यांच्या रस्त्यांची पाहणी करतांना निदर्शनात आल्या आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी संबंधीत अधिकारी व कंत्राटदारांना येत्या 3 दिवसात कावड यात्री व वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत व सुरक्षीत करावा असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय महामार्गाचे साईट इंजिनिअर श्री. जोशी व कंत्राटदाराचे प्रोजेक्ट मॅनेजर आशिष मोरे यांना स्पष्ट शब्दात कानउघाडणी करून दिले.
कावड यात्रेचे दरम्यान काही अनुचित घटना घडली तर या सर्वस्व जबाबदारी संबंधीत रस्त्याचे काम करणा-या कंत्राटदार व अभियंतावर राहील. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमाप्रमाणे व जनतेच्या जिवाला धोका निर्माण होवू शकतो या कारणास्तव त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट निर्देश दिलेत.
कावडयात्रा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व कावड यात्रा सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी महानगरपालीका क्षेत्रातील राजराजेश्वर मंदिरापासून ते अकोटफैल पर्यंत भागातील रस्त्यांची पाहणी केली. रस्त्या दरम्यान असलेल्या अडथळे तसेच रस्ता दुरूस्ती , वॉटरसप्लायच्या कामामुळे झालेले खड्डे तसेच केबलच्या कामामुळे झालेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालीका प्रशासनाला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिलेत.
गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या काठावर ज्या ठिकाणावरून राजराजेश्वर जलाभिषेक करण्यासाठी जल आणल्या जाते त्या भागाची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. या ठिकाणी कावड यात्रेंना कोणतेही प्रकारची अडचण व समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना पोलीस विभागाला त्यांनी दिल्यात. यावेळी गांधीग्रामचे सरपंच आनंद काठोळे हे उपस्थित होते.