अकोला- महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील विविध मार्गावर रहदारीत अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली. ही मोहिम फार्स ठरु नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहरातील गांधी चौक, जैन मंदीर परिसर, बस स्थानक रोड वरील, टाॅवर चौक रोड, मुख्य डाक घर ते सिव्हिल लाईन रोडवरील, नेकलेस रोडवरील, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या चहाच्या टपऱ्या, पान ठेले, पोलवर विना परवानगी लावलेले छोटे जाहिरात होर्डिंग काढण्यात आले. तसेच नेहरू पार्क रोडवरील छत्री,कारपेट व कुशन किरकोळ व्यावसायिकांच्या साहित्यावर जप्तीची कारवाई केली. िवनी,शिवर येथील अवैधरीत्या मांस विक्रीची दुकाने तोडण्यात आली व बायपास वरील दुकानासमोरील टीनशेडचे व ओट्यांचे अतिक्रमणे काढण्यात आले.या कारवाईत अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर, विजय बडोणे, प्रवीण मिश्रा, संजय थोरात, प्रवीण इंगोले, सुरक्षा रक्षक विनोद वानखडे, सैय्यद रफीक, डोंगरे, कवाले, खराटे, विजय तिवारी, बामनेट आदी सहभागी झाले होते.
अतिक्रमण काढण्याच्या कामात अडथळा
मनपातर्फे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाच्या कामात एका युवकाने अडथळा निर्माण केल्याचा प्रकारच्या शुक्रवारी घडला. ही घटना मुख्य डाक कार्यालयासमोर गुप्ता ज्यूस सेंटरचे अतिक्रमण काढताना घडली. महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना युवकाने शिवीगाळ केली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात अनुप ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला.