नवी दिल्ली: नीट परीक्षा दिलेल्या अडीच लाख विद्यार्थ्यांचा डाटा लीक झाल्याचे प्रकरण गंभीरपणे घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. डाटा लीक झाल्याचे निदर्शनास आणून देत राहुल गांधी यांनी याबाबत सीबीएसईच्या अध्यक्ष अनिता कारवाल यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा गोपनीय ठेवण्याची गरज असताना काही वेबसाईटसवर तो उपलब्ध करण्यात आला आहे. पैशासाठी हा प्रकार चालला आहे. विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डाटा लीक होण्याचा प्रकार गंभीर आहे. डाटा सुरक्षित ठेवण्याकडे लक्ष दिले गेले नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी चौकशी करून जे कोणी अधिकारी यासाठी जबाबदारी आहेत; त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.