अकोला– सहनशीलतेचीही काही मर्यादा असते म्हणतात….पण अकोलकर एवढे सहनशील आहेत की खरेच त्यांची कमाल आहे…अकोला-अकोट, अकोला-तेल्हारा,अकोला-बार्शीटाकळी, मूर्तिजापूर,कोणत्याही रस्त्याने जा वाहन चालक रडकुंडीला अन त्यात बसणारा अदमोसा झाल्याशिवाय राहत नाही.
विकास कामे होत असताना थोडी गैरसोय होणारच… पण जिल्ह्यात सध्या जे काही सुरू आहे त्यावरून येथे प्रशासन नावाची व्यवस्था जिवंत आहे असे वाटत नाही. अकोला -अकोट मार्गावर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शेकडो वाहने फसूनही कुणावर काहीच परिणाम झाला नाही.
या रस्त्याचा ठेकेदार एवढा निब्बर आहे की त्याचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही अशी परिस्थिती आहे.भर पावसाळ्यात त्याने या रस्त्याची अशी एशितैशी करून ठेवली की त्याचे वर्णन फक्त त्या रस्त्याने ये जा करणारेच करू शकतात.गटारातून वाहन चालविण्याचा अनुभव सध्या वाहनधारक या रस्त्यावर घेत आहेत, दुचाकी तर सोडा चारचाकी वाहन घेऊन जाण्याची हिम्मत सध्या या मार्गावरून होत नाही…या मार्गएवजी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करा अशी कोरडी प्रेसनोट काढण्यापालिकडे प्रशासन काहीही करू शकले नाही….महामार्गावर एवढी कामे सुरू असताना अर्धा रस्ता वाहतुकीसाठी खुला असतो,पण या मार्गावर अतिशय मूर्खासारखे प्रयोग सुरू आहेत….जनता प्रचंड त्रास सहन करीत आहे…..
तेल्हारा रस्त्याची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही….खड्ड्यांमुळे महामंडळाच्या गाड्या या रस्त्यावर दररोज बंद पडतात. कुणाला काही देने घेणे नाही. वाडेगाव, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, बार्शी टाकळी कोठेही जा….खराब रस्ते तुमची पाठ सोडत नाहीत….एकीकडे रस्त्यांसाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च होत असताना हा पैसा जातो कोठे याचा शोध घेण्याची गरज आहे…
अकोला शहरातील रस्ते तर सध्या चालण्यासारखे नसले तरी पाहण्यासारखे जरूर आहेत…म्हणे शहरात विकास पर्व सुरू आहे….लोकांच्या जीवावर उठलेलं हे पर्व तुम्हाला लखलाभ…थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या….करोडो रुपये खर्चून तयार केलेला स्टेशन रोड पांदण रस्त्यालाही लाजवत आहे…या रस्त्यावर उडणारी धूळ ही जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक नाही का?
अत्यंत वर्दळीचा नेकलेस रोडही भ्रष्ट यंत्रणेचा बुरखा फाडत आहे.नेहरू पार्क चौकापासून या रस्त्यावर सुरू होणारे जीवघेणे खड्डे टक्केवारीची साक्ष देतात….थोड्याश्या कारणावरून आकांड तांडव करणारे आत्ता का गप्प आहेत याचे उत्तर शेम्बडे पोरही देऊ शकतो…गोरक्षण रोड चे काम संथ गतीने सुरू आहे… इनकम टॅक्स चौकातील खड्ड्यात कंबर एवढे पाणी साचले आहे.. काय आहे हे?
या मुख्य रस्त्यांचीच अशी अवस्था आहे असे नाही…कोणत्याही भागात जा, अशीच परिस्थिती पाहायला मिळेल….कोठे केबल साठी खोदलेल्या नाल्या… कोठे एलईडी साठी केलेले खोदकाम तर कोठे पाण्याच्या पाईपलाईन साठी केलेले खड्डे….सर्वत्र नुसते उकरून ठेवले आहे.. या कामांसाठी अनेक ठिकाणी पेव्हर काढण्यात आले, काम झाल्यानंतर ते बसविण्यात मात्र आले नाहीत…. जाऊ द्या आपले काय जाते….कुणाची जबाबदारी आहे ही….सारे पैसे खाण्यात मश्गुल….मरू द्या लोकांना…जिल्हाधिकारी महोदयांनी फक्त नोटीस दिली….नोटिसने काही होणार नाही….गब्बर आणि निब्बर आहेत सगळे….कारवाई करा, काळ्या यादीत टाका , अनामत जप्त करा…पुन्हा बदमाशी करण्याची कोणी हिम्मत करणार नाही….
बदमाशीची काही हद्द असते….येथे तसे काहीच नाही….आता एवढ्या पावसात अकोट रोडवर डांबरीकरण सुरू आहे…हे नियमात बसते का?पटोकार साहेब नुसत्या उंटावरून शेळ्या हाकणे बंद करा….नुसते बिले काढण्यासाठी अन खिसे भरण्यासाठी काम न करता थोडी तरी इमानदारी दाखवा….जनता सहनशील आहे, शांत आहे म्हणून अंत पाहू नका…!
अधिक वाचा : अकोट वाहतूक पोलिसांची कर्तव्यदक्षता घर विसरलेल्या बहीण भावाला केले आई वडिलांच्या स्वाधीन