अकोला (प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण अधिक आहे, या भागातील जमिनीच्या सुधारासाठी शेततळे वरदान ठरणार आहेत, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि जलयुक्त शिवार योजनेतून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत, मात्र या दोन्ही योजनांचे एकत्रिकीकरण करुन भूसुधाराचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी सूचना मा. मुख्यमंत्र्यांनी केली.
आवश्यकतेनुसार जलसंधारणाची कामे योग्य योजनेतून पूर्ण करावीत, ही कामे करताना एकत्रित आराखडा तयार करुन पूर्ण करावीत. जलसंधारणाची कामे वेगाने होण्यासाठी भारतीय जैन संघटनेची मदत घेऊन ही कामे २०१९ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, असेही यावेळी मा. मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
जुन्या गावठाणातील घरे शहराच्या हद्दीत आली आहेत, या घरांच्या आठ-अ नमुन्यानुसार आर्किटेक्टकडून विकास आराखडा तयार करुन घेऊन तो नगररचना विभागाकडून मंजूर करुन घ्यावा, तसेच अतिक्रमीत घरांच्याबाबतीत पक्क्या घरांना नियमित करुन उर्वरित घरांचे प्रमाणिकीकरण करुन झोपडपट्टी सुधार कायद्यानुसार उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले.
यावेळी यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील,सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपकजी सावंत, आमदार श्री. प्रकाशजी भारसाकळे, श्री. गोवर्धनजी शर्मा, श्री. गोपीकिशनजी बाजोरिया, श्री. रणधीरजी सावरकर, श्री. हरिषजी पिंपळे, श्री. बळीरामजी सिरस्कार, महापौर श्री. विजयजी अग्रवाल, मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव श्री. प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा : दुधाला अनुदानाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली