सेंट पीटर्सबर्ग: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सुरुवातीला ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना व पोर्तुगाल यांसारखे संघ विश्वचषकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र स्पर्धा जसजशी मध्याकडे वाटचाल करत होती, तसतसे इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघांकडे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जाऊ लागले. मात्र विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात हे दोन्ही संघ उपान्त्य फेरीत बाहेर पडले आणि आता या दोन दावेदारांमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी महत्त्वपूर्ण लढत आज (शनिवार) रंगणार आहे.
इंग्लंड आणि बेल्जियम हे दोन्ही संघ याआधी गटसाखळीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करत गटातील अव्वल स्थान काबीज केले होते. उद्याच्या सामन्यातही इंग्लंडपेक्षा बेल्जियमचे पारडे अधिक जड मानले जात आहे. कारण बेल्जियमच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केलेच आहे, त्याचबरोबर त्यांच्या खेळाडूंनी संघासाठी बहुमोल कामगिरी नोंदवली आहे.
एडन हॅझार्ड, केव्हिन डी ब्रुयने, ड्राइज मेर्टेन्स, रोमेलू लुकाकू आणि ऍक्सेल वित्सेल या मातब्बर खेळाडूंच्या उपस्थितीत बेल्जियमने चांगली कामगिीर केली असली, तरी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये गोल करण्यात येत असलेल्या अपयशामुळे त्यांना या कमकुवत बाजूचा फटका बसताना दिसून येत आहे. तर युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या इंग्लंडच्या संघाने विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये गोल करण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्यांची बचावफळी काहीशी कमकुवत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच उपान्त्य सामन्यात आघाडीवर असतानाही त्यांना पराभूत व्हावे लागले होते.
फिफा विश्वचषक आजची लढत-
दि. 14-07-2018
तिसऱ्या स्थानासाठी सामना –
1) इंग्लंड (13) – प्रमुख खेळाडू- हॅरी केन, हॅरी मॅग्वायर, कायरॉन ट्रिपियर, जेस्सी लिनगार्ड, डेले अली व ऍश्ले यंग.
विरुद्ध बेल्जियम (3) – प्रमुख खेळाडू- एडेन हॅझार्ड, मरोने फेलैनी, केविन डी ब्रुईन, रोमेलू लुकाकू व नासर चॅडली.
ठिकाण- क्रेस्टोव्हस्की स्टेडियम, सेंट पीटर्सबर्ग
वेळ – सायंकाळी 7-30
अधिक वाचा : Hima Das :First Indian woman athlete to win a gold at the world level