फिफा विश्वचषक २०१८ च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात फ्रान्सनं बेल्जियमला १-० नं नमवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. फ्रान्सकडून सॅम्युअल उम्मिटीनं ५१व्या मिनिटाला हेडरनं गोल डागला. सॅम्युअलनं अँटनी ग्रीजमॅनच्या कॉर्नरचे अचूकपणे गोलमध्ये रुपांतर करत स्पर्धेतील पहिला गोल केला. फ्रान्सचा संघ गेल्या २० वर्षांमध्ये तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात पोहोचला आहे.
सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या बेल्जियमला पाचव्या मिनिटाला कॉर्नर किक मिळाली. मात्र याचा फायदा नासेर चाडलीच्या दिशाहीन शॉटमुळं संघाला घेता आला नाही. फ्रान्सनं देखील १०व्या मिनिटाला चांगला मूव्ह तयार केला. मात्र, पेनल्टी बॉक्समध्ये सावध असणाऱ्या बेल्जियमच्या बचावफळीनं फ्रान्सचे प्रयत्न निष्फळ ठरवले. पुढे दोनच मिनिटांनंतर फ्रान्सनं बेल्जियमचा मूव्ह निष्प्रभ करत पलटवार केला, मात्र एमबापे पासपर्यंत पोहोचण्यापूर्वीच गोलकीपर थिबाउट कॉर्टोइसनं चेंडूवर कब्जा केला.