अकोला दि.(प्रतिनिधी) :- सदयस्थितीमध्ये प्लॅस्टीक बंदी झाल्यामुळे कापडी पिशव्यांची मागणी होत आहे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना शिलाई मशिनचे वाटप यापुर्वी विविध सामाजिक उपक्रमामधुन करण्यात आलेले आहे. प्लॅस्टीक बंदीमुळे वाढलेली कापडी पिशव्यांची मागणी शिवणकाम करू शकणा-या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांच्या माध्यमातून पुर्ण करण्याचा नाविन्य पुर्ण उपक्रम जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने अकोला जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला आहे. याकरिता “वावर” या उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहे. वावर ही जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची संकल्पना असुन उपजिल्हाधिकारी राजेश खवले हे या उपक्रमाचे नोडल अधिकारी आहेत. हया आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या खरेदी करण्याचे विविध सामाजिक संस्थांना जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले होते.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध सामाजिक संस्थाकडून या संस्थेकडून 10 हजारापैक्षा जास्त कापडी पिशव्या खरेदी करण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला ग्रामपंचायत माझोड यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. माझोड ग्रामपंचायतचे सरपंच जोत्स्ना साहेबराव खंडारे, उपसरपंच विदयाधर गणेशराव बराटे यांनी गावातील विधवा , परित्यक्ता , गरीब कुटूंबातील 70 महिलांना एकत्रीत करून त्यांना कापडी पिशव्या शिवण्यासाठी प्रवृत्त केले आहे. या महिलांनी शिवलेल्या कापडी पिशव्या खरेदी करून त्या विक्री करण्याची जबाबदारी ग्रामपंचायात माझोड यांनी घेतलेली आहे.
आज दि. 9 जुलै 2018 रोजी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या दालनात माझोड गावातील विधवा , परित्यक्ता , गरीब कुटूंबातील महिलांनी पिशव्या शिवण्याचा व सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या शिवलेल्या पिशव्या खरेदी करण्याचा करार झाला. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबासाठी विविध उपाय योजना केलेल्या आहेत. परंतू माझोड ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल अभिनव व नाविन्यपुर्ण आहे. अशा प्रकारचा उपक्रम जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीने करावा . त्यामुळे गावातील विधवा , परित्यक्ता , गरीब कुटूंबातील महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचा माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दयावा असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
यावेळी साहेबराव खंडारे, सविता रमेश पुंडे, लक्ष्मी संजच बचे, निता दत्ता हिरडकर, राजश्री पुरूषोत्तम खडसे, उषा संजय पुंडे, मंगला जितेंद्र वानखडे, वर्षा महादेवराव टोळे आणि रुख्मा सावरकर उपस्थित होत्या.