बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार शरद केळकर हा नेहमीच त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे लक्षात राहतो.
‘मोहन्जो दारो’, ‘हलचल’, ‘रॉकी हँडसम’, ‘सरदार गब्बर सिंग’ आणि ‘बादशाहो’ चित्रपटांमधील त्याच्या कामाची प्रशंसा झाली. हाच अभिनेता आता राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद माने दिग्दर्शित ‘यंग्राड’ चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिकेद्वारे आहे.
शरद याने ‘रॉकी हँडसम’ मध्ये साकारलेला एसीपी दिलीप सानगोडकर, ‘मोहन्जो दारो’ मधील सुर्जन, ‘भूमी’ मधील धौली, ‘बादशाहो’ मधील इन्सपेक्टर दुर्जन या व्यक्तिरेखा गाजल्या. त्यांचे प्रेक्षकांकडून तसेच समीक्षकांकडूनही कौतुक झाले.
‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये मध्यवर्ती व्यक्तिरेखेतील प्रभासला शरद केळकरने ‘व्हॉइसओव्हर’ दिला होता, हेही कित्येकांना ठाऊक नाही. ‘यंग्राड’ चित्रपटाच्या ‘ट्रेलर’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात शरदने साकारलेल्या भूमिकेचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे त्याच्या रोलची प्रचंड चर्चा आहे.
शरद म्हणतो की, ‘यंग्राड’मधील माझी भूमिका अर्थपूर्ण आहे. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांप्रमाणेच प्रेक्षक माझी ही भूमिकाही डोक्यावर घेतील. याची मला पूर्ण खात्री आहे. प्रत्येक तरुणाची गोष्ट असलेला हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा, असे मी आवर्जून सांगेन. ‘यंग्राड’ चित्रपट ६ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यात शरदसह शशांक शेंडे, सविता प्रभुणे, विठ्ठल पाटील आणि युवा कलाकार चैतन्य देवरे, सौरभ पाडवी, शिव वाघ आणि जीवन करळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अधिक वाचा : महेंद्र सिंह धोनी च्या चित्रपटचा सेकंड सीक्वल लवकरच पडद्यावर