मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८ च्या उपविजेतेपदाचा मुकुट डोक्यावर चढला आणि एक पुण्याची असेलली श्रुती शिंदे असामान्य व्यक्तिमत्व ठरली. ही गोष्ट आहे पुण्याच्या श्रुती शिंदे या तरुणीची. पॅरिस कम्युनिकेशन प्रा. लि. ने कोलंबो येथे आयोजित केलेल्या मिस अँड मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८ या स्पर्धेत पुण्याच्या श्रुतीने उपविजेतेपद (फस्ट रनरअप) पटकावले आहे..
या वेळी आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर क्षण आहे. निवडचाचणी पासूनच मी कठोर मेहनत घेतली आणि मिळालेल्या यशामुळे मी समाधानी आहे.’ आपल्या संपूर्ण प्रवासात समर्थपणे साथ दिल्याबद्दल तिने तिच्या बहिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तिच्या सौंदर्याने सर्वांना सुखद धक्के दिले असले तरी सामाजिक प्रश्नांवर तिने घेतलेल्या खंबीर भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्पर्धेच्या टॅलेंट राऊंडमध्ये तिने स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचाराच्या मुद्यावर आधारित नृत्य सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व या महत्वाच्या सामाजिक प्रश्नाकडे लक्षही वेधले. तिचे हे सादरीकरण संपूर्ण स्पर्धेदरम्यान चर्चेचा विषय ठरले. या स्पर्धेत सर्वात प्रतिभाशाली उमेदवार असलेल्या श्रुतीने ‘मिसेस फोटोजेनिक, मिसेस ब्युटीफुल व मिसेस इंडिया वेस्ट’ आणि ह्या किताबांवर आपले नाव कोरले आहे.
स्पर्धेत अधिकाधिक कठीण फेऱ्यांचा सामना करत श्रुती शिंदे ने अंतिम फेरीपर्यंत आपली विजयी वाटचाल कायम राखली. एका चर्चेत सोशल मीडियापासून होणाऱ्या नुकसानाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘सध्याच्या पिढीमध्ये सोशल मीडिया ‘ट्रेंडिग’ आहे. परंतु यामुळे तरुणाईची दिशाभूल होत आहे. चुकीच्या बातम्या पसरवण्यात सोशल मीडियाची मोठी भूमिका आहे.’
पॅरिस कम्युनिकेशन्स मिस अँड मिसेस इंडिया युनिव्हर्स या स्पर्धेद्वारे स्वतःची क्षमता सिद्ध करण्यास उत्सुक असलेल्या अविवाहित व विवाहित स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध करुन देते. ज्याद्वारे त्यांना त्यांच्या प्रतिभेला प्रयत्नांची जोड देत बहर आणता येईल.