राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित संजू चित्रपट आज प्रदर्शित झाला. जो दहशतवादीचा ठपका माथ्यावर घेऊन वावरत आहे अशा अभिनेत्याचं आयुष्य एका चित्रपटापेक्षा नक्कीच कमी नाही. त्यामुळे संजय दत्तच्या आयुष्यात नेमकं काय घडलं याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न हिरानी यांनी केला. संजयच्या आयुष्यावर चित्रपट येतोय म्हटल्यावर चित्रपटात संजयची चांगली बाजू दाखवण्यात आली आहे असा अनेकांचा समज हिरानी यांनी खोडून काढला आहे.
संजय जसा होता, जसा आहे त्याच्या चांगल्या आणि वाईट बाजूंसह मोठ्या पडद्यावर रणबीरनं तो साकारला आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांच्या थेट हृदयाला हात घालतो.
चित्रटाची सुरूवात होते ती संजय दत्तच्या आत्मकथेनं. आपली गोष्ट जगासमोर आणण्यासाठी संजय दत्त लेखकाच्या शोधात असतो, दहशवाद्याचा ठपका डोक्यावर असलेल्या संजयला आपली खरी गोष्ट सांगण्याचा तोच एकमेव मार्ग दिसतो आणि अशाप्रकारे लेखिकेची भूमिका साकारत असलेल्या अनुष्का शर्माची चित्रपटात एण्ट्री होते आणि सुरू होतो संजू बाबाचा प्रवास.
असं म्हणतात की हा चित्रपट रणबीरनं त्याचं पडतं करिअर सावरण्यासाठी लावलेला एक सट्टाच होता आणि या खेळात रणबीर पूर्णपणे यशस्वीदेखील होतो. चित्रपट संपल्यानंतर दोन व्यक्ती ठसठशीत लक्षात राहतात एक म्हणजे खुद्द रणबीर आणि दुसरा म्हणजे विकी कौशल. संजयच्या जवळच्या मित्राची भूमिका विकीनं साकारली आहे. संजूच्या आयुष्यातील चढ उतार पाहिलेला हा मित्र एका गोष्टीमुळे त्याच्या आय़ुष्यातून कायमचा निघून जातोय याच निखळ मैत्रीची गोष्ट या चित्रपटातून हळूवारपणे उलगडत जाते.
संजूच्या आयुष्यात आलेल्या टीना मुनीमपासून ते मान्यता दत्तपर्यंतच्या अनेक स्त्रिया त्यांच्यासोबत असलेलं संजयचं नातं हेही तितक्याच नाजुकपणे या चित्रपटातून उलगडलं आहे. दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना या तिघींनीही आपापल्या परिनं भूमिकांना न्याय दिला आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या संजय दत्तची यातून बाहेर येणारी धडपड मोठ्या पडद्यावर पाहिली की अंगावर काटाही येतो आणि त्या परिस्थितीचा विचार करायलाही भाग पाडतो. चित्रपटाची गाणी लक्षात राहिली नसली तरी ‘कर हर मैदान फतहे’ हे गाणं ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात.
सोनम कपूर – अनिल कपूर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र
रणबीरच्या आयुष्यातीत त्याचं प्रेरणास्थान आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे सुनील दत्तही परेश रावल यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारले आहे. संजयनं दंगलीच्या काळात एके ४७ का बागळली होती यामागचं कारणंही तितकंच ऐकण्यासारखं आहे. मनिषा कोईरालाही नर्गिसच्या भूमिकेत खुलून दिसत आहे. तुरुंगात गेल्यानंतर पूर्णपणे बदललेला संजय दत्त, तुरुंगातलं टॉयलेट लिकेजचं दृश्यं अशी चित्रपटातली अनेक दृश्य थेट मनाला जाऊन भिडतात. म्हणूनच रणबीरनं संजू ला पूर्णपणे न्याय मिळवून दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
विशेष म्हणजे एकाच आयुष्यात अनेक व्यक्तिरेखा जगलेला संजय दत्त उर्फ संजू शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, विचार करायला लावतो आणि चित्रपट संपल्यानंतरही लक्षात राहतो. म्हणूनच हा चित्रपट एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन पाहावाच.