अकोला : हवामानाची दररोजची माहिती शेतकरी, जनतेला देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात आले. या फलकाचे लोकार्पण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी केले.
कृषी विद्यापीठाचा कृषी विद्या विभाग व कृषी हवामान शास्त्र विभागाने हवामान विषयक माहितीचे फलक लावण्यात आले. या डिजिटल माहिती फलकाद्वारे नागरिकांना व शेतकऱ्यांना दररोज हवामान घटक जसे की कमाल व किमान तापमान, प्रत्यक्ष तापमान, सकाळ व दुपारची हवेतील आर्द्रता, गेल्या २४ तासातील पर्जन्यमान तसेच यावर्षीच्या १ जूनपासूनचे एकूण पर्जन्यमानबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध केली आहे.
तापमान कमी झाले, वाढले, पाऊस किती झाला, पाऊस कधी येणार अनेकांना ही माहिती चर्चेतून कळते. बरेच जणांना माहिती नसते. विशेष करू न शेतकऱ्यांना बऱ्याचदा याबाबत माहिती नसते. त्यामुळे शेतकरी अनेकदा हवामानाचा अंदाज न घेता पेरणी करतात, पेरणी केलेल्या पिकांना संरक्षित सिंचनाची सोय असूनही उशीर होतो. याच पृष्ठभूमीवर ही माहिती शेतकऱ्याना मिळण्यासाठी कृषी विद्यापीठा, अकोला येथे मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल फलक लावण्यात आला.
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू भाले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद तुपे, डॉ. एम. आर. देशमुख व डॉ. नितीन गुप्ता यांनी यासंदर्भात अद्ययावत माहिती उपलब्ध करण्यात पुढाकार घेतला.
याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. व्ही. के खर्चे, कृषी विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. एम. बी. नागदेवे, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. बी. व्ही. सावजी, दुग्ध शास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरू ण इंगोले तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : जुलै महिन्यातही पाऊस सरासरी गाठेल – पूर्वानुमान हवामान विभाग