लोकजागर मंचाचा उपक्रम धमाका, अभिनेते भारत गणेशपुरे तेल्हाऱ्यात
तेल्हारा – हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन पर्वावर 1 जुलै रोजी लोकजागर मंच प्रयोगशील शेतकरी आणि जलमित्र यांचा सन्मान करणार आहे.
रविवार 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता येथील सेठ बन्सीधर विद्यालय प्रांगणावर होणाऱ्या या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेता भारत गणेशपुरे हे उपस्थित राहणार असून लोकजागर मंच अध्यक्ष अनिल गावंडे, बेणीप्रसाद झुनझुनवाला , नगराध्यक्षा जयश्री पुंडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कृषीदिन आणि अनिल गावंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकोट व तेल्हारा तालुक्यातील 25 प्रयोगशील शेतकरी आणि वाटर कप स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या 25 जलमित्रांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
स्त्री रोगनिदान शिबीर
तेल्हारा शहर व तालुक्यातील स्त्रियांसाठी 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सेठ बन्सीधर विद्यालयात ‘स्त्री रोगनिदान शिबीर’ सुद्धा आयोजित केले आहे. या शिबिरात डॉ शहनाज खान, डॉ संजीवनी बिहाडे, डॉ हर्षवर्धन मालोकार, डॉ शिखा केसान डॉ गीता मल्ल, आणि डॉ धर्मेंद्र राऊत महिलांची आरोग्य तपासणी करणार आहेत. याच शिबिरात रक्तगट तसेच रक्ताच्या इतरही चाचण्या विनामूल्य करण्यात येतील .
स्पर्धा परीक्षा वाचनालय उदघाटन !
दुपारी 3 वाजता अभिनेते भारत गणेशपुरे विठ्ठल मंदिर सभागृह हिवरखेड येथे ‘विद्यार्थी संवाद’ कार्यक्रमात उपस्थित राहतील. तेथील लोकजागर मंच कार्यालय आणि स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उदघाटन करून इंग्लिश स्पिकिंग कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करतील. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकजागर मंचाने केले आहे .
अधिक वाचा : अकोला : एक दिवसीय ‘आम्ही कारभारणी’ प्रशिक्षण अभियान