रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या मेळघाटातील रेल्वेच्या ब्रॉडगेज कामाला मान्यता देण्यात येऊ नये. अकोला ते खंडवा रेल्वेसाठीच्या सध्याच्या प्रस्तावित मार्गाऐवजी पर्यायी मार्गाने रेल्वे चालिवण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.एच. विद्यासागरराव यांच्याकडे करण्यात आली आहे.
बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी केली असून पर्यायी रेल्वेमार्गामुळे १०० गावे आणि सुमारे अडीच लाख लोकसंख्येला लाभ होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱ्या अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज कामाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. ‘चेंज डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावरून या ब्रॉडगेज कामाविरोधात ऑनलाइन याचिका प्रसारित करण्यात आली आहे. या याचिकेच्या माध्यमातून रेल्वेमार्ग रुंदीकरणाच्या विरोधात अभियान राबविण्यात येत आहे. विकास करीत असताना त्याचा फटका जंगलाला आणि मेळघाटसारख्या वाघांच्या समृद्ध अधिवासाला बसणे चुकीचे आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने या रेल्वेमार्गाऐवजी पर्यायी मार्ग शोधावा, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
पर्यायी मार्गाने रेल्वेप्रवास सुरू केल्यास मेळघाटातील शंभर गावे जोडली जाणार असून, सुमारे अडीच लाख लोकसंख्येला त्याचा लाभ होणार आहे असा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. हाच मुद्दा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून मांडला आहे. पर्यायी मार्गाने रेल्वे गेल्यास त्या मार्गावरील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
सध्याचा रेल्वेमार्ग हा फक्त नऊ गावांमधून जातो तर पर्यायी मार्ग हा १०० गावांसाठी लाभदायक ठरणारा आहे. या शिवाय, या परिसरातील व्यापार आणि उद्योगाला त्याचा लाभ होईल. नवी रेल्वे स्टेशन्स बांधली गेल्यास त्याचाही रोजगार निर्मितीकरिता लाभ होणार आहे. प्रस्तावित मार्ग हा वनजीवनाला बाधक ठरणारा आहे. नवा मार्ग हा सर्वच घटकांसाठी लाभदायक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या चमूने देखील हे मुद्दे आपल्या अहवालात मांडले होते. त्यामुळे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्यास मनाई केली जावी. त्या ऐवजी पर्यायी रेल्वेमार्गाचा विचार केला जावा, अशी मागणी सपकाळ यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांकडे केली आहे.
अधिक वाचा : सुषमा स्वराज यांनी लॉन्च केलं पासपोर्ट सेवा अॅप, आता घरबसल्या काढा पासपोर्ट