पासपोर्ट सेवा अॅप : केंद्र सरकारकडून पासपोर्ट बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून नुकताच पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता मोबाइल अॅपद्वारे घरबसल्या देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट घरपोच येईल. पासपोर्ट सेवा अॅप यासाठी लॉन्च करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही घोषणा केली.
याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट बनवताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आणि या अडचणी संपवल्याची घोषणा केली. आता लग्नाच्या प्रमाणपत्राची पासपोर्ट बनवण्यासाठी आवश्यकता नाही, अशी माहिती त्यांनी दिली. पासपोर्टसाठीचे अनेक जुने आणि अडचणीचे नियम बदलले असून सामान्य व्यक्तीच्या दृष्टीकोनातून साधे-सरळ नियम बनवण्यात आल्याचे स्वराज म्हणाल्या.
जन्मदाखला –
सर्वाधिक अडचणी जन्माच्या दाखल्यावरुन येत होत्या. पण आता जन्म दाखल्याऐवजी ७ ते ८ दुसऱ्या कागदपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने समावेश केलेली ही कागदपत्रं सहजतेने उपलब्ध होणारी आहेत. यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना किंवा यांसारख्या सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अन्य कागदपत्रांवरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.
अनाथ. साधू-संन्यासी, आणि घटस्फोटीत महिलांसाठी नियम झाले सोपे-
अनाथालयातील मुलांसाठी तेथील प्रमुख जी जन्म तारीख देतील ती ग्राह्य धरली जाईल. साधू-संतांच्या बाबतीत त्यांच्या आई-वडीलांऐवजी त्यांच्या गुरूंचं नाव ग्राह्य धरलं जाईल. याशिवाय घटस्फोटीत महिलांना त्यांच्या आधीच्या पतीचं नाव पासपोर्टसाठी अर्ज करताना विचारलं जाणार नाही.
असं डाउनलोड करा अॅप –
गुगल प्लेस्टोअर वरुन पासपोर्ट सेवा अॅप डाउनलोड करता येईल. या अॅपद्वारे पासपोर्टशी निगडीत सर्व कामं करता येतील.
देशात एकूण 307 पासपोर्ट सेवा केंद्र –
सुषमा स्वराज म्हणाल्या, देशात सध्या एकूण ३०७ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत, गेल्या ४ वर्षांमध्ये देशात पासपोर्ट क्रांती झाली. आम्ही गेल्या ४ वर्षांमध्ये एकूण २१२ पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले. आगामी काळात पासपोर्ट केंद्र नसलेलं देशात एकही लोकसभा क्षेत्र नसेल, असंही स्वराज म्हणाल्या.
अधिक वाचा : खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार