*तालुक्यातील पहिलीच कारवाई,व्यवसाईकांमध्ये भीतीचे वातावरण
* व्यावसायिक मात्र संभ्रमात
तेल्हारा(निलेश जवकार)- गेल्या २३ तारखेपासून महाराष्ट्रात प्लास्टिक पिशवी वापरण्यास बंदी घातली असून महाराष्ट्र भरात कारवाईचा धुमधडका सुरू असून आज शहरातील फळविक्रेत्याला प्लास्टिक बंदीचा फटका बसला असून नगर परिषद कडून कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
आज स्थानिक सेठ बन्सीधर विद्यालय समोरील फळविक्रेता प्लास्टिक पिशवीचा वापर करीत असल्याचे लक्षात आल्याने न प मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांनी सदर फळविक्रेता आबिद शहा या विरुद्ध कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई तेल्हारा तालुक्यातील पहिलीच कारवाई असल्याने व्यावसायिक यांच्या मनात कारवाईची भीती निर्माण झाली आहे.न प कडून पथक निर्माण करून तपासणी करून कारवाईचा धुमधडका सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
प्लास्टिक पिशवी बंदी घालण्यात आल्याने व्यवसाईकांमध्ये संभ्रमाचे तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी कोणती प्लास्टिक पिशवी वापरावी व्यवसाय करीत असताना बऱ्याच वस्तू अशा आहेत की त्या प्लास्टिक पिशवी शिवाय उत्पादन कम्पनी कडून येत नसल्याने व त्या वस्तू खराब होणार या काळजीने वस्तू वापरून विक्री करायच्या कशा हा प्रश्न निर्माण झाला आहे.