अकोला(प्रतिनिधी)-पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या अर्धांगिणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि त्याला सहाय्य करणाऱ्या शिपाई मनोज चव्हाण यांना निलंबीत करण्यात आले आहे. सेंट्रल बँकेचेअकोलायेथील क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र मलालीकर यांनी २३ जून रोजी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणात लवकरच उपरोक्त दोघांची विभागीय चौकशी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला बँकेचा शिपाई मनोज चव्हाण (रा. अकोला) याचे ह्रदयाचे ठोके वाढल्याने त्याला मलकापूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सेंट्रल बँकेच्या एका अधिकार्याने मलकापूर येथे जाऊनत्याच्या हातात निलंबनाची नोटीस बजावली असून त्यावर त्याची स्वाक्षरीही घेतली आहे. दुसरीकडे सेंट्रल बँकेचे आणखी एक अधिकारी हे वर्धा येथे पोहोचले असून दाताळा शाखाधिकाऱ्याच्या तेथील घरावर राजेश हिवसेला निलंबीत करण्यात आले असल्याबाबतची नोटीस त्याच्या वर्ध्यातील स्टेट बँक कॉलनीतील घरावर चिपकविण्यात आली आहे. राजेश हिवसे सध्या फरार असून पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत. दाताळा येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पीककर्जाच्या मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीस तेथील शाखाधिकारी राजेश हिवसे याने शरीर सुखाची मागणी केली होती. यासंदर्भात पीडित महिलेने मोबाईलवरील त्याचे संभाषण रेकॉर्ड करून मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर पोलिसांनी सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसेसह त्याला मदत करणारा शिपाई मनोज चव्हाण यांच्या विरोधात अपराध क्र. १०८/१८ कलम ३५४ अ, (२), भादंवि, सहकलम ३ (१), (डब्ल्यू), (१),३ (१), (डब्ल्यू) (२) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये २२ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पासून शाखा व्यवस्थापक हिवसे आणि शिपाई हे दोघेही फरार झाले होते. दरम्यान, या दोघांना पडकण्यासाठी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन पथके नियुक्त केली होती. त्यातील एका पथकाने शिपाई मनोज चव्हाण यास अटक केली आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहीती सुत्रांनी दिली.