अकोला, दि. 23 — सुमारे 500 इतकी लोकसंख्या असणाऱ्या किनखेड (सा) गावात पाणी फाउंडेशन अंतर्गत मोठया प्रमाणात कामे झाल्याने हे गाव जलमय झाले आहे. आता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून हे छोटेसे गाव आदर्श करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा दिलासा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला आहे.
बार्शिटाकळी तालुक्यात किनखेड हे गाव निसर्गाच्या कुशीत वसले आहे. या गावातील समस्या जाणून घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक या गावाला भेट दिली. यावेळी संपूर्ण गावात त्यांनी फेरफटका मारुन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या गावात पाणी फाउंडेशन अंतर्गत श्रमदानातून 20 शेततळयांचे काम झाले आहे. तसेच 3100 मीटरचे सि.सि.टी. 8 ग्याबियन बांध, 2400 मीटरचे डिप सि.सि.टी., 800 मीटर नाला रुंदीकरण, 1600 मीटर कंटुर बांध, 71 शोषखडडे, 5 विहीर पुर्नभरणाचे कामे झाले आहेत. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे या सर्व जलसंधारणाच्या कामांमध्ये पाणी खेळताना दिसत आहे.
गावचे सरपंच संजय आंधळे यांचे मार्गदर्शन आणि गावकऱ्यांची उत्तम साथ तसेच पाणी फाउंडेशनच्या तालुका समन्वयक विदया वाकोडे यांच्या सहकार्याने किनखेड आता पाण्याने परिपूर्ण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामांची पाहणी करुन गावकऱ्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली. किनखेडच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल, अशी ग्वाही देताना हे गाव आदर्श करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी पंधरा दिवसांत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. गावातील 12 वी पास तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. धाबा येथील स्वराज भारत वाकोडे हा ॲटोचालकाचा मुलगा रुडकी येथे नामांकित आयआयटी संस्थेत इंजिनिरींगचे शिक्षण घेत आहे, याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वराजचे कौतुक करीत त्याला भविष्यात कुठलीही मदत लागली तर आपणास सांगावे, असा दिलासा देऊन शुभेच्छा दिल्या.
***