अकोला : पावसाळ्याच्या तोंडावर बियाण्यांची ओरड ही बाब नित्याचीच झाली आहे. काही वेळा पुरेशी बियाणे मिळत नाहीत तर बियाणे उपलब्ध झाली तरी ती बोगस असतात. अशा तक्रारी येतात. यंदा बियाणे उपलब्ध असली तरी पावसाने हुलकावणी दिल्याने बियाण्यांची खरेदी थंडावली आहे. काही ठिकाणी तर ५० टक्केच बियाण्यांची उचल झाली आहे. पाऊस सुरू न झाल्याने पेरण्याही झालेल्या नाहीत किंवा काही ठिकाणी झालेल्या पेरण्या फुकट जातील, अशी शक्यता आहे.
विदर्भात ५० टक्केच उचल ; पीक कर्ज वेळेत न मिळाल्याचाही फटका
नागपूर/अमरावती : पावसाने दिलेली हुलकावणी, पतपुरवठय़ातील अडचणी, पीक निवडीविषयी शेतकऱ्यांमधील संभ्रमावस्था या कारणांमुळे पूर्व व पश्चिम विदर्भात बियाणे खरेदी मंदावली आहे. अमरावती व नागपूर विभागातील काही भागात पेरणी सुरू झाली असली तरी केवळ ५० टक्केच बियाण्यांची उचल झाल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाने सोयाबीन बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले असले, तरी बहुतांश दुकानांमध्ये ते उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम योजनेअंतर्गत सोयाबीन बियाण्यांची ३० किलोग्रॅम वजनाची बॅग १३५० रुपयांमध्ये मिळते. दुसरीकडे, खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची बॅग १६५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु अनुदानावर एकच बॅग मिळत असल्याने शेतकरी असमाधानी आहेत. या वर्षी सरकारने ४५० ग्रॅमच्या बी.टी. बियाणांसोबत २२ ग्रॅम नॉन बी.टी. बियाणांची पेरणी करण्याची सक्ती केली आहे. यामुळे बोंडअळी प्रादुर्भाव कमी होईल, असे सरकारचे म्हणणे आहे, असे वर्धा जिल्ह्य़ातील देवळी येथील शेतकरी गिरीश काशीकर यांनी सांगितले. यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात सुमारे ७ लाख ७८ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. सुमारे ९० टक्के बियाणे पुरवण्यात आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या संकटामुळे यंदा कपाशीच्या पेऱ्यात घट होईल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. त्यामुळे कापूस बियाण्यांची मागणी कमी झाली आहे. पाऊस लांबल्यास मुगाच्या पेऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या शेतकरी अत्यंत सावधपणे बियाण्यांची खरेदी करताना दिसत आहेत. अमरावती विभागात आतापर्यंत पाऊस विखुरलेल्या स्वरूपात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ २६ टक्के, अकोला ६० टक्के, अमरावती ७७ टक्के, यवतमाळ ८१ टक्के तर वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक १११ टक्के पाऊस झाला आहे. केवळ दहा दिवसांचा पाऊस पडला आहे. अनेक भागात अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही, त्याचा थेट परिणाम बियाणे बाजारावर होताना दिसत आहे.
कापसाला भाव मिळत नसल्याने नागपूर विभागातही यंदा कापसाचे लागवडी क्षेत्र कमी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. नागपुरात जूनच्या पहिल्या आठवडय़ात बियाणे खरेदीसाठी गर्दी उसळी होती. यंदा चित्र वेगळे आहे. बियाण्यांचा तुडवटा नाही. परंतु पाऊस थांबल्याने बियाणे विक्रीही थांबली आहे, असे नागपुरातील कॉटन मार्केटमधील एका बियाणे विक्रेत्याने सांगितले.