इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशाची गुणवत्ता यादीची अशी आहे तारीख
इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंट या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत आज संपली. जातपडताळणी प्रमाणपत्राशिवाय अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागात फेर्या माराव्या लागणार आहेत. प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थ्यांचे लक्ष आता पहिल्या गुणवत्ता यादीकडे लागले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) नियंत्रणात असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. इंजिनिअरिंगची पहिली गुणवत्ता यादी 24 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रवेश अर्जासोबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील 60 टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडणार आहे.
या अनुषंगाने प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाची मुंबईत नुकतीच बैठक झाली. यात इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि.27 पर्यंत मुदत देण्यात आली. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी 23 जूनपर्यंत जातपडताळणीसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याने नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण विभागात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे.
सेवकांच्या संख्येत वाढ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जातपडताळणी समितीकडे दाखल होणारे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समितीकडे असणारे मनुष्यबळ कमी पडत असल्याने सचिवांच्या आदेशानुसार त्यांनी महात्मा फुले महामंडळाच्या सेवकांचे सहकार्य घेतले आहे. या महामंडळाकडे एकूण 22 सेवक असून त्यातील किती जणांना हे काम शक्य आहे याविषयी चाचपणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश जातपडताळणी समिती सदस्या वंदना कोचुरे यांनी दिले आहेत.
इंजिनिअरिंग वेळापत्रक
21 जून : प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट
22 व 23 जून : सुविधा केंद्रावर कागदपत्र जमा करणे
24 जून : पहिली अंतिम गुणवत्ता यादी
25 ते 28 जून : कॅप राऊंड-1
30 जून ते 4 जुलै : अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी)
फार्मसी वेळापत्रक
20 जून : प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट
21 व 22 जून : सुविधा केंद्रावर कागदपत्र जमा करणे
23 जून : पहिली अंतिम गुणवत्ता यादी
24 ते 27 जून : कॅप राऊंड-1
29 जून ते 2 जुलै : अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरद्वारे (एआरसी)