बँकिंग क्षेत्रात कार्यरत कृषिअधिकाऱ्यांनो शेतकरी हित जोपासत विनाविलंब पिककर्ज वितरीत करा – कुलगुरु डॉ. विलास भाले
अकोला (प्रतिनिधी)-राज्यातील बहुतांश शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडला असून येणारा खरीप हंगाम सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी विशेषत: शेतकऱ्यांचे आर्थिक स्त्रोत बळकट करण्यासाठी बँकिंग क्षेत्रात कार्यरत कृषी पदवीधरांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत पिक कर्ज प्रकरणे अतिशिघ्र मार्गी लावत वेळेत पतपुरवठा उपलब्ध होण्याचे दृष्टीने भूमिका बजावावी असे भावनिक आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले आहे. राज्यातील सर्वच कृषि विद्यापीठे, कृषि विभाग, तत्सम सर्व शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी आणि खाजगी संस्था शेती आणि शेतकरी हितासाठी सामुहिक प्रयत्न करीत आहेत हि समाधानाची बाब आहे असे सांगतांना शेतकरी वर्गाला आर्थिक तरतुदीशिवाय हंगाम सुरु करण्यात बाधा निर्माण होऊ शकतात हे गृहीत धरून कृषि पदवीधर बँक अधिकारी वर्गानी अंतर्मुख होऊन आपली जबाबदारी पार पाडावी व कृषिचे आपले संस्कार जोपासावे असेही डॉ. भाले यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. राज्यातील विविध बँकांना गत दोन तीन वर्षात तरुण तडफदार उच्चविद्या विभूषित कृषि पदवीधर अधिकारी म्हणून लाभले आहेत हि विद्यापीठ तथा शेती क्षेत्रासाठी जमेची व अभिमानाची बाजू असून ग्रामीण भारताचे उन्नतीसाठी आपले सत्वोत्तम योगदान देत कृषीच्या बळकटीकरणास्तव कार्य करावे असे डॉ. भाले यांनी नमूद केले आहे.
तर पावसाचा अंदाज व जमिनीतील उपलब्ध ओल लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा असे शेतकरी वर्गाला दिलेल्या संदेशात डॉ. भाले यांनी म्हटले आहे. पावसाचा सध्या पडलेला खंड आणि पावसाचे भाकीत गृहीत धरून पिक नियोजन करावे व याकरिता कृषि विद्यापीठाच्या, कृषी विभागाच्या संपर्कात राहावे असे सुचविले आहे.
अधिक वाचा : ” एक दिवस शेतक-यांसोबत ” या उपक्रमाचे 30 जुन रोजी आयोजन