अकोला(प्रतिनिधी)-उत्तर प्रदेशातील मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाच्या युवाआघाडी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहिलेले तसेच आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे विदर्भ संघटक पदावर कार्यरत असणारे अकोल्यातील प्रसीद्ध मुकीम अहमद यांचे गेल्या चार दिवसांपूर्वीच अकोला शहरातून अपहरण झाले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने खदान पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर त्यांची गाडी बेवारस स्थितीत आढळून आल्याने त्यांचे अपहरण झाले असल्याच्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले होते. पोलीस तपास सुरू असताना मोबाईल टॉवर लोकेशननुसार त्यांचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे दिसून आले होते. त्यांच्या शोधात असलेल्या पोलीस पथकाने तपास करीत शोध घेतला असता बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर ते जानेफळ रस्त्यावरील जंगलात जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात मुकीम अहमद व त्यांचे सहकारी शफीक मौलाना यांचे आज सकाळी मृतदेहच आढळून आल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून समजते .
मुकिंम अहमद व शफीक मौलाना यांची हत्या आपसी वैमनस्यातून करण्यात आली असावी असा कयास लावल्या जात आहे. त्यातूनच अपहरण व त्यानंतर हत्या झाली असावी अशी शंका आता व्यक्त केली जात असून पोलीस याकामी अधिक तपास करीत आहेत. मुकिंम अहमद यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला दाखल झाली होती, आता त्या दोघांचेही मृतदेहच सापडल्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास करण्यात येईल.पोलीस तपासात संशयाची सुई नेमकी कुणीकडे जाते हे मात्र येणारा काळच सांगेल. दरम्यान मुकिंम अहमद यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला असून अंतिम संस्कार त्यांच्या मूळ गावी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे करण्यात येत असल्याची माहिती आहे.