अकोला, दि. 1 — आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा प्रचार-प्रसार वेगाने होत आहे, माहितीचा वेगाने प्रसार करणारे सोशल मिडियासारखे महत्त्वाचे माध्यम सर्वांकडेच उपलब्ध आहे. याव्दारे माहिती पाठवताना कुणाचे नुकसान होणार नाही, याबाबतची दक्षता घेऊनच याचा काळजीपूर्वक वापर करावा. विशेषत: फेक न्यूज, अफवांबाबत सतर्कता बाळगून या बाबींचा प्रचार प्रसार करु नये, याची दक्षता प्रत्येकाने घेणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “फेक न्यूज परिणाम आणि दक्षता” या विषयावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मीर साहेब, प्रा. सोनल कामे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर यांनी यावेळी सादरीकरणाव्दारे फेक न्यूज परिणाम व दक्षता याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, प्रिंट मिडियाबरोबर सोशल माध्यमांद्वारे माहितीची देवाण-घेवाण वाढली आहे. यातून आपले जीवन सुकर झाले असले, तरी खोट्या माहितीतून कुठलीही दुर्देवी घटना होणार नाही याची जबाबदारी ओळखून प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. फेसबुक व व्हॉटस्अपवरील माहितीची सत्यता पडताळणी करणे महत्वाचे आहे. मिडिया प्रत्येक घरात पोहचत आहे. समाज माध्यम प्रबोधनात मिडियाचा महत्वाचा सहभाग आहे. समाज माध्यमावरील कोणत्याही माहितीची खात्री केल्याशिवाय ती पुढे फारवर्ड करु नये.
श्री. सागर पुढे म्हणाले की, सोशल मिडियाव्दारे लोकांमध्ये द्वेष, भिती पसरवणे, भावना दुखावणे हा सायबर गुन्हा आहे. समाज माध्यमांमधून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असले तर तो चिंतेचा विषय आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मॅसेज पूर्ण वाचून त्याविषयी खातरजमा करुनच तो पुढे गेला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी सजग असले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच त्याचा गैरफायदा घेण्याचे तंत्र गुन्हेगारांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे करत आहेत. तसेच व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक वेळा खोटी माहिती, अफवा पसरवण्याची प्रकरणे घडत आहेत. एखादी चांगली माहिती फॉरर्वर्ड करावी पण, समाजामध्ये भिती , तेढ निर्माण करणारी माहिती पुढे पाठवू नये.
प्रा. सोनल कामे म्हणाल्या की, एखादे ज्ञान किंवा चांगली उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर योग्य आहे. समाजमाध्यमांवर येणारे वृत्त हे खरे की, खोटे हे नागरिकांनी ओळखावे. अफवांच्या प्रतिबंधासाठी पोलिस प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. कुठल्याही प्रकारची माहिती, व्हीडिओ आपल्याकडे आले, तर त्याची खात्री करावी. ते समाजाच्या हिताचे नसतील, तर ते तत्काळ डिलिट करावेत. ते अन्य ग्रुपमध्ये शेअर करू नयेत. तसेच इतरांनाही याबाबत जाणीव करुन देत अशा प्रकारची माहिती अन्यत्र शेअर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अफवांबाबत माहिती मिळाल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
श्री. मीर साहेब म्हणाले की, फेक न्यूजमुळे होणारे परिणाम हे गंभीर स्वरुपाचे असतात, माहितीची सत्यता पडताळुनच माहितीचे प्रसारण केले जावे. अकोला जिल्हयातील पत्रकार सजग असल्यामुळे खोटया माहितीचा प्रसार होत नाही. फेक न्यूज परिणाम आणि दक्षता या कार्यशाळेच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळाली. अशा कार्यशाळा या सर्व समाजघटकांसाठीही आवश्यक आहेत.
प्रास्ताविक श्री. धोंगडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती दाताळकर यांनी केले. कार्यशाळेला मोठया संख्येने पत्रकार उपस्थित होते.