अकोला, दि. 27 — तारफैल येथील रेल्वे प्रशासनाच्या जागेला लागून असलेल्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगर पालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. भविष्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून सदर लोकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अकोला शहर झोपडपटटीमुक्त करण्याचाही प्रशासनाचा मानस असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज सदर विषयासंबंधी बैठक झाली. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, मनपाचे विरोधी पक्ष नेते साजीद खान पठाण, नगरसेवक मोहमद इरफान, रेल्वेचे वरिष्ठ अभियंता निशित माल, स्टेशन अधिक्षक पी.एम. फुंडकर, अभियंता अरविंद रायबोले, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर आदी उपस्थित होते.
तारफैल येथील रेल्वे प्रशासनाच्या जागेला लागून सुमारे 218 घरे आहेत, ही जागा मोकळी करण्यासाठी रेल्वेने रहिवाशांना नोटीस जारी केली आहेत. त्यामुळे या लोकांचा घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली. आमदार बाजोरिया यांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत या लोकांना घरे मिळण्यासाठी मनपाने नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यासाठी प्रशासनाचे सहकार्य राहिल, असे सांगून अकोला शहर झोपडपटटी मुक्त करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.