अकोला – बालकांच्या लैंगिक संरक्षणासाठी तसेच महिला व वृद्धांच्या संरक्षणासाठी जननी -२ या उपक्रमाचे पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत लॉन्चिंग केले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किमान २० शाळा-महाविद्यालयांमध्ये अर्थात जिल्ह्यातील ५०० शाळांमध्ये पोलिस पोहोचणार आहेत.
या वेळी कायद्यात झालेले बदल आणि घ्यावयाची काळजी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. ‘आज की नारी देश का भविष्य’ हे घोषवाक्य घेऊन जननी-२ राबवणारा अकोला राज्यातील पहिला जिल्हा आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अनेक उपक्रमांची पोलिस अधीक्षकांनी घोषणा केली.
१२ जुलै ते २२ जुलै दरम्यान विशेष अभियान व त्यानंतर निरंतर जिल्ह्यात महिलांबाबत जनजागृती व गुन्हे घडण्यापूर्वीची दक्षता म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विशाखा समितीचाही अाढावा या वेळी घेण्यात येणार अाहे. महिलांना व विद्यार्थिनींना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी, कायदेविषयक ज्ञान व्हावे या अनुषंगाने २६ ते ३० जुलै २०१६ दरम्यान जननी हा उपक्रम राबवण्यात आला होता.
हा उपक्रम महिलांमध्ये विश्वास प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. या योजनेचा व्यापक व विस्तृत टप्पा म्हणून जननी- २ जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी अभियानासंदर्भात विस्तृत माहिती दिली. पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, पोलिस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होते.
फिरती मीडिया व्हॅनद्वारे जागृती
कायदेविषयक मार्गदर्शनासाठी फिरती मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात फिरती राहणार आहे. गावागावांमध्ये प्रबोधन होणार असल्याने नागरिकांना या व्हॅनचा फायदा होणार आहे.
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणार
या अभियानादरम्यान पोलिस ठाणे स्तरावर मुलामुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येतील. जेणेकरून त्यांच्यावर एखादा बाका प्रसंग उद्भवल्यास त्यांना धैर्याने सामोरे जाता येईल.
एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलांची घेतली जाणार आहे आता काळजी
शहरासह जिल्ह्यातील ज्या घरांमध्ये एकटे वृद्ध राहतात. त्यांची देखभाल करण्यासाठी कुणी नाही. अशांचा पोलिस ठाणेनिहाय शोध घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी खास महिला पोलिस नियुक्त केल्या जाणार आहेत.
सोशल सिक्युरिटी ब्रँचची स्थापना
महिला संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने सोशल सिक्युरिटी ब्रॅचची नव्याने स्थापन करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला. महिलांविषयक गुन्ह्याचा तपास, कारवाईचे काम ही शाखा करेल. आयुक्तालय स्तरावर ही शाखा असते. ती प्रथम जिल्हास्तरावर कार्य करणार आहे.
अधिक वाचा : लक्झरी बस च्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू