Maha Kumbh 2025 | मनात ईश्वाराशी तादात्म्य पावण्याचा भाव बाळगत वसंत पंचमीच्या उदय तिथीचा मुहूर्त साधत कोट्यवधी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती (गुप्त) नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर अमृत स्नानाचा अनुभव घेतला. महाकुंभाचा हा 21 वा दिवस. त्याही द़ृष्टीने दिवस महत्त्वाचा… त्यात वसंत पंचमीचा दिवस… त्रिशूल, तलवारी नाचवत आणि डमरू, शंखांच्या निनादात साधू, संत आणि ईश्वराच्या भूलोकावरील अवतारांनी हा सुवर्ण योग साधला.
खरे तर वसंत पंचमी रविवारी रात्री 9 वाजून 44 मिनिटांनी सुरू झाली. त्यामुळे सामान्य भाविकांनी त्यानंतर लगेच गंगेत डुबकी मारत मोक्षाची याचना केली. मात्र, साधू-संतांच्या आखाड्यांनी सूर्योदयाची वाट पाहत उदय तिथीचा मुहूर्त साधला. पहिल्या दोन मानाच्या आखाड्यांनी आपल्या स्नानासाठी पहाटे पाचला प्रस्थान ठेवले. महानिर्वाणी आणि अटल आखाड्यांनी प्रस्थान ठेवताच त्यापाठोपाठ निरंजनी आणि आनंद आखाड्यांनी प्रस्थान ठेवले. देवाची स्तुती करणारी भजने म्हणत नाचत श्रद्धाळू या भक्तिपर्वात सहभागी होत होते. ‘हर हर महादेव’ च्या जयघोषाने आसमंतही भक्तिरसात न्हाऊन निघत होता.
अंगाला राख फासून वेगवेगळ्या रंगछटा लेवून हे साधू मुक्तीच्या द़ृढविश्वासाने संगमाच्या दिशेने जात असतात. कोणी घोडा, कोणी हत्ती तर कोणी अन्य काही प्राण्यांनाही आपल्या मोक्ष वाटचालीत सहभागी करून घेताना दिसतात. जुना आखाडा, त्यांच्या सहयोगी किन्नर आखाड्यासह या महाकाय भक्तिपर्वात सहभागी होतात. एकेक करत 13 ही आखाडे आपल्या स्नानाच्या अमृत सोहळ्यात सहभागी होतात. त्यांच्या सोबत असतो तो भाविकांचा जनसागर. त्यात जवळपास 20 देशांतून आलेले मोक्षार्थी… संगमाकडे जाणारे रस्ते दहा कि.मी. अंतर माणसांच्या गर्दीने भरून गेलेले असतात. ही तोबा गर्दी पाहून हनुमान मंदिर बंद करण्याचा निर्णय त्याच्या पुजार्यांनी घेतलेला. ही गर्दी किती… तर दि. 13 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंतच 36 कोटी भाविकांनी अमृत स्नानाचा लाभ घेतलेला. त्यात नव्या सहा ते सात कोटींची भर आजच्या योगामुळे पडणार.
‘ऑपरेशन 11’
एकेरी मार्गाची काटेकोर अंमलबजावणी
एकेरी मार्गाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. गर्दी आणि घुसमट होऊ नये म्हणून वाहतूक वळवण्याचे पर्याय उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ
नव्या यमुना पुलावर अतिरिक्त सुरक्षा. संगमाकडे जाणार्या मार्गावरील बंदोबस्तावर गॅझेटेड अधिकार्याची नजर. दुचाकीवरील दोन पथकांची गस्त. पुलाच्या बाजूच्या कठड्यांचे मजबुतीकरण.
शास्त्री सेतूवर गस्त
झूंसीकडून संगमाकडे जाणार्या रस्त्यावर पॅक कंपनी आणि प्रशासकीय अधिकारी नियुक्त. वाहने आणि पादचारी यांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दुचाकी पथकांची गस्त.
तिकारमाफी तुम येथे गर्दी नियंत्रण
केंद्रीय राखीव सशस्त्र पोलिसांचे एक पथक प्रशासकीय अधिकार्याच्या देखरेखीखाली तैनात करण्यात आले आहे. कटका तिहरा, जिराफ क्रॉसिंग, छटांग वळण आणि समुद्रकुप वळणमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
फफमाऊ, पोनटून पुलावर सुविधा
दुचाकीवरील दोन पथके फफमाऊ आणि पोनटून पुलावर गस्त घालत आहेत. राखीव दलाचे पोलिस प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर गर्दीचे नियंत्रण करत आहेत.
रेल्वे, बसस्थानकावर विशेष व्यवस्था
झूंसी रेल्वेस्थानकावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात आहे. बाहेर जाण्याच्या आणि प्रवेशाच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. रेल्वेंची संख्या वाढवण्यात आली आहे.
तात्पुरते बसस्थानक
सरस्वतीद्वार येथे तात्पुरते बसस्थानक उभे करण्यात आले आहे. तेथून गोरखपूर आणि वाराणसीला बसेस आहेत. राखीव बसेस पुरेशा प्रमाणात आहेत. अंदवा-सरस्वतीद्वारादरम्यान शटल बससेवा आहे.
प्रयाग जंक्शनवर विशेष सुरक्षा
पोलिस आणि राखीव पोलिसांच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या. प्रयागराज जंक्शनकडे जाणार्या रस्त्यावर वाहतूक नियोजनासाठी युधिष्ठिर जंक्शन येथे तळ उभारण्यात आला आहे. त्यात पर्यटकांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था आहे.
अतिरिक्त सुरक्षा, वाहतूक उपाययोजना
अंदवा आणि साहसू फाट्यावर अतिरिक्त बंदोबस्त आणि वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तेथे सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी मोटारसायकलची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत. क्रेनही तैनात केल्या आहेत.
अतिरिक्त सुरक्षा दले तैनात
तिसर्या अमृत स्नानासाठी शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, राखीव पोलिसांच्या तीन तुकड्या, 56 शीघ्र प्रतिसाद पथके, 15 दुचाकीवरील पथके तैनात करण्यात आली आहेत.
जवाहर आणि हर्षवर्धन चौकात व्यवस्था
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक नियमनासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. तेथून भाविकांना स्टॅनले मार्गाने मेळा मैदानात पाठवण्यात येत आहे. अन्य वाहतूक येथून वळवण्यात आली आहे
चेंगराचेंगरीच्या घटनेचे सावट
गेल्या अमृत स्नानाच्या मुहूर्ताला म्हणजे मौनी अमावस्येला चेंगराचेंगरी घडलेली. त्याचे सावट भाविकांच्या मनात मुळीच नव्हते. त्यांची आस्था पुन्हा त्याच उमेदीने ओसांडून वाहत होती. मात्र, पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केलेली. जवळपास 60 हजार पोलिसांचा ताफा गर्दी नियंत्रणाच्या कामात व्यस्त. पावणेतीन हजार सीसीटीव्ही गर्दीवर नजर ठेवत असून, जवळपास तेवढेच कर्मचारी डोळ्यांत तेल घालून त्याकडे लक्ष देत आहेत.
कडेकोट बंदोबस्त काटेकोर नियोजन
महाकुंभाच्या स्नानात गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे, ‘ऑपरेशन इलेव्हन’ असे नाव त्याला देण्यात आलेय. नदी ओलांडताना पुलावर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची विशेषत्वाने काळजी घेण्यात येत आहे. संगम घाटावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय, वरिष्ठ अधिकारीही संगमावर तळ टोकून बसले आहेत. सुरक्षित अमृत स्नान हाच जणू त्यांचा योग अन् मोक्षही…