मुंबई : आपल्याला माहिती आहे, की हवामान बदलामुळे आजकाल पावसाच्या हंगामात देखील बदल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठीच्या पाण्याचे नियोजन करणे अवघड झाले आहे. पिकांना वर्षभर पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी शेततळे अगदी फायद्याचे ठरते. यामुळेच महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
महाराष्ट्रातील कित्येक नागरिकांची उपजिवीका ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. बहुतांश भागातील कोरडवाहू शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्याच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे कित्येक वेळा दुबार पेरणी किंवा आलेले पीक जळून जाण्याचा प्रकार घडतो. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आहे. शेततळे तयार करण्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता महाराष्ट्र शासन पुढे आले आहे. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. शेततळे ही योजना शेतकऱ्यास संजीवनी देणारी योजना ठरली आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा
या योजनेमध्ये राज्यातील पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी आपल्याकडे उपलब्ध जमिनीनुसार, तसेच आपल्या गरजेनुसार शासनाच्या नियमावलीनुसार आपल्याला हव्या त्या आकारातील शेततळे तयार करू शकेल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील शेतकरी, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर ज्येष्ठता यादी तसेच प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषांवर लाभार्थींची निवड केली जाईल.
शेततळ्याचे प्रकार
- नैसर्गिक घाल अथवा ओघळ अडवून
- सपाट जमिनीतील शेततळे
जागेची निवड
- जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी.
- मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्यासाठी निवडू नये.
- शेततळ्याला लागणारी जागा ही शेतकऱ्यांनी स्वखुषीने व विनामूल्य द्यावे.
मागेल त्याला शेततळे | नियम व अटी
लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच, कृषी विभागाचे अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी आणि निश्चित केलेल्या आकारमानानुसार शेततळे असावे. शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करणे.
शेतकऱ्याने आपल्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे आवश्यक आहे. शेतीच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतींची लागवड करणेही गरजेचे आहे. शेततळ्याच्या कामासाठी शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळणार नाही. तसेच, शेततळ्यातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्याने स्वखर्चाने करणे अपेक्षित आहे. या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पिकांना देखील नवसंजीवनी मिळणार आहे. आर्थिक मदत मिळाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी शेततळ्याचा पर्याय अवलंबतील. परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याचे संवर्धन केले जाईल आणि शेतीचे पाण्याविना होणारे नुकसान देखील टळणार आहे. राज्यातील नागरिकांना शेतीकडे आकर्षित आणि प्रोत्साहित करणे, तसंच शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करुन त्यांचे राहणीमान सुधारणे हीदेखील शासनाची उद्दिष्टे आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ या माध्यमातून ही उद्दिष्टे पूर्ण होण्यास नक्कीच मदत होणार आहे.