बुलढाणा : जिजाऊ माँसाहेबांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधव यांचा समाधीस्थळ परिसर विकसित करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने सिंदखेडराजा येथे उत्खनन सुरू आहे. या दरम्यान शेषनागावर पहूडलेल्या शंख, चक्र, गदाधारी भगवान विष्णुची अतिशय कलात्मक व पौराणिक मूर्ती आढळून आली आहे.
मूर्तीची अशी आहेत वैशिष्ट्ये
पौराणिक शिल्प एकाच दगडात कोरलेले आहे. कमळावर ब्रम्हा तर मूर्तीच्या मस्तकावर शेषनागाचा फणा समुद्रमंथनाचे दृश्य साकारलेले दुर्मिळ प्रकारातील रेखीव शिल्प भगवान विष्णुची चरणसेवेत बसलेली लक्ष्मी व सोबतच समुद्रमंथनाचे दृश्य साकारलेले दुर्मिळ प्रकारातील रेखीव शिल्प पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे हे पौराणिक शिल्प एकाच दगडात कोरलेले आहे. ते अन्यत्र स्थलांतरीत करू नये. सिंदखेडराजा येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. भगवान विष्णु मुर्तीच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रम्हा तर मूर्तीच्या मस्तकावर शेषनागाचा फणा आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंदखेडराजा शहरात अलिकडील उत्खननादरम्यान अनेक मूर्ती आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी महादेवाची पिंड व मंदिराचा चौथरा मातीखाली दबलेला आढळून आला होता. त्यानंतर या उत्खननाची व्याप्ती वाढवण्यात आली.
राजे लखुजीराव जाधव यांची समाधी सोळाव्या शतकात बांधली
राजे लखुजीराव जाधव यांची सर्वात मोठी दगडी बांधकाम असलेली ही समाधी सोळाव्या शतकात बांधण्यात आलेली आहे. जगातील हिंदू राजाची सर्वात मोठी समाधी म्हणून या स्थळाचा उल्लेख होतो. या स्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी याच समाधी परिसरात सध्या केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन सुरू आहे. याच उत्खननात मागील महिन्यात शिवपिंड आढळून आल्यानंतर येथे सुरू असलेले उत्खनन अधिक काळजीपूर्वक व गांभीर्याने केले जात आहे.
संपूर्ण मंदिराचा चौथरा येथे आढळला
शिवपिंड मिळालेला परिसर खोदण्यात आल्यानंतर संपूर्ण मंदिराचा चौथरा येथे आढळला. तो पायापर्यंत खोदला जात असताना चार दिवसापूर्वी अत्यंत रेखीव कलाकुसर असलेली भगवान विष्णुची विश्राम अवस्थेतील मूर्ती, पायाजवळ सेवारत लक्ष्मीची मूर्ती आढळून आल्यानंतर केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षणचे नागपूर येथील अधीक्षक अरूण मलिक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिंदखेडराजा येथे भेट देवून उत्खननातून भगवान विष्णु ची मुर्ती बाहेर काढण्याचे काम केले. सोबत असलेल्या तज्ज्ञांना मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधीक्षक अरुण मलिक यांनी सांगितले की, ही मूर्ती कुठे ठेवली जाणार हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल. यावेळी पुरातत्व सहायक शिल्पा दामगडे, शाम बोरकर, शाहीद अख्तर, दीपक सुरा आदी उपस्थित होते.