पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धनाचे व सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या गर्भगृहातील काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या 2 जूनपासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लावून बसले असतानाच विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु असतानाच एक दगड खचला. तो दगड काढून पाहिला असता तर त्या ठिकाणी 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले. या तळघरात मोठ्या तीन तर लहान दोन मूर्ती सापडल्या आहेत. त्याचबरोबर पादुका, बांगड्याचे तुकडे, पैशाची जुनी नाणी सापडली आहेत.
तळघरात नेमकं काय काय सापडले?
- मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे तळघर
- 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले
- तळघरात मोठ्या तीन तर लहान दोन मूर्ती सापडल्या आहेत.
- पादुका, बांगड्याचे तुकडे, पैशाची जुनी नाणी सापडली आहेत.
तळघर की भुयारी मार्ग? या प्रश्नांची उत्सुकता संपली
त्यामुळे या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे. या प्रश्नांची उत्सुकता संपली आहे. पुरातत्व विभाग व वास्तू विशारद तसेच मंदिर समितीचे अधिकारी यांच्या उपस्थित दुपारी ५.१५ वाजता तळघरात काय आहे, हे तपासण्याचे काम सुरू केले. प्रथम लहान दोन मुर्त्या सापडल्या. त्यानंतर पादुका सापडली. यानंतर तळघरात चूनामाती, बांगड्या चे काच तुकडे सापडले. त्यानंतर पैशाची जुनी नाणी सापडली. तर आणखी आता उतरून पाहिले असता विष्णू, व्यंकटेश व महिषासूर मर्दिनी अवतारातील चार फूट उंचीच्या मुर्त्या सापडल्या आहेत. आणखी शोध काम सुरू आहे.
मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी तीन टप्प्यात काम
दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामाला 15 मार्च पासून सुरुवात झालेली आहे. याकरीता श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शनही बंद करण्यात आलेले आहे. तर सकाळी 6 ते 11 या वेळेतच केवळ मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील संवर्धन व सुशोभिकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मंदिरातील हनुमान दरवाजा येथील दगडी फरशीचे व भिंतीच्या दगडांचे फ्लोरिंग करण्याचे काम सुरु होते. दगडी फरशीचे फ्लोरिंग करीत असताना एक दगड खाली दबला गेला. तेथे पोकळी निर्माण झाली. तेव्हा तो दगड बाजुला काढून घेण्यात आला. तेव्हा त्या दगडाच्या खाली पोकळी दिसून आली. फ्लोरिंग करणार्या कर्मचार्यांनी बॅटरीच्या प्रकाशझोतात पाहिले असता येथे तळघर असल्याचे दिसून आले आहे.
तळघरात मूर्ती सदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
या तळघरात मूर्ती सदृष्य वस्तू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र, एकच दगड काढून पाहणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे तळघर आहे की भुयार आहे. याबाबत नेमके सांगता येत नाही. तसेच या सहा बाय सहा च्या तळघरात कशाची मुर्ती आहे. हे समजू शकलेले नव्हते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी मंदिर समितीने पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती. त्यानुसार दुपारी ५.१५ वाजता मंदिर समितिचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, वास्तुविशारद तेजस्वीनी आफळे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, महाराज मंडळी, तज्ञ यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली आहे. असाही एक अंदाज वर्तवला जात आहे की, मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यातसाठीश्री विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होती. मुर्ती ठेवण्यासाठीचेच हे तळघर आहे का ? याबाबतही माहिती घेतली जात आहे.