अकोला,दि.15 : जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचा परिसर तंबाखूमुक्त असणे आवश्यक असून, शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आढळल्यास त्वरित कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. जिल्हा नार्को समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सीमा झावरे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी.बी गाढवे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस निरीक्षक सुनील किनगे, संतोष तिवारी, सहाय्यक पो. निरीक्षक अर्चना गाढवे, एम. एम. राठोड, विश्वास थोरात, अशोक जाधव, दर्शन जनईकर आदी अधिकारी उपस्थित होते
जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी कारवायांबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. अंमली पदार्थांचे सेवन व त्यापासून होणारे धोके लक्षात घेता अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्रामध्ये अमली पदार्थांची लागवड होणार नाही याबाबत तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधा यांची तपासणी करून अमली पदार्थांपासून होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करावी असे श्री. कुंभार म्हणाले.
रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांची वाहतूक होऊ नये यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रवाशांच्या बॅग तपासणी व्यापकपणे करावी व परिसरातील अमली पदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक श्री. सिंह यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील सर्व औषधी विक्री होणाऱ्या मेडिकल शॉपवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक असून वैद्यकीय दुकानांची आकस्मिक तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.