पुणे : तलाठी परीक्षेतील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी गेल्या महिन्यात भूमिअभिलेख विभागाने जाहीर केली. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू केली आहे. ही प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित उमेदवारांना तलाठीपदाचे नियुक्तिपत्र वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी अपर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी दिली.
तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध केली आणि भरतीचा पुढील टप्पा म्हणून निवड यादी, प्रतीक्षा याद्या 23 जानेवारीला रात्री उशिरा राज्यातील 23 जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केल्या आहेत. उर्वरित आदिवासीबहुल 13 जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे.