अकोला,दि.८: जिल्ह्यातील एक १४ वर्षांची बालिका अत्याचाराला बळी पडून गर्भवती राहिली होती. येथील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ने न्यायालयाचा आदेश मिळवून तिचा गर्भपात घडवून आणत तिला न्याय मिळवून दिला आहे. जिल्ह्यातील एका अल्पवयीन १४ वर्षीय बालिका एका नराधमाच्या बलात्काराला बळी पडली. या अत्याचारामुळे बालिका गर्भवती राहिली होती. सुरूवातीला ही बाब तिच्या आईवडलांना कळली नाही. मात्र, तसे कळताच तिचे आईवडील मुलीला घेऊन पोलीसांमार्फत जिल्हा स्त्री रूग्णालयातील सखी वन स्टॉप सेंटर येथे उपस्थित झाले. वैद्यकीय तपासणीनंतर व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बालिकेवर प्रथमोपचार व तपासणी करण्यात येऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले.
बालिकेच्या पालकांनी गर्भपात करून मिळण्याबाबत केलेल्या विनंती अर्जानुसार बाल कल्याण समितीने तात्काळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय मंडळाकडून अहवाल मागविला. वैद्यकीय मंडळाने तिचा गर्भपात धोकादायक नसल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने बालिकेच्या गर्भपाताला संमती दिली. पूर्ण वैद्यकीय देखरेखीत बालिकेचा गर्भपात करण्यात आला.
या संपूर्ण कालावधीत बालिकेला न्याय मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, सदस्या ॲड. शीला तोष्णीवाल, सदस्या प्रांजली जयस्वाल, सदस्य राजेश देशमुख, विनय दांदळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूरकर, विधी सल्लागार ॲड. विलास काळे, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक ॲड. मनिषा भोरे, चाईल्ड लाईन समन्वयिका हर्षाली गजभिये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव व सदस्य यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला.