अकोला,दि.8: जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन वाहने उपलब्ध झाली असून, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ही वाहने कार्यालयांना आज सुपुर्द करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील कार्यालयांच्या बळकटीकरणासाठी अनेकविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अकोट, बाळापूर व अकोला येथील उपविभागीय कार्यालयाला न्यू बलेरो वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्यालयांच्या बळकटीकरणासाठी सर्व आवश्यक बाबी मिळवून देण्यात येतील. जिल्ह्यातील नागरिकांना जलद व गतिमान सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले व वाहनांच्या चाव्या उपविभागीय अधिकारी श्री. जावळे व श्री. हांडे यांना सुपुर्द करण्यात आल्या. विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.