केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी दिली आहे. आज (दि.१८) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने ६ रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
मसूरच्या ‘एमएसपी’मध्ये ४२५ रुपये प्रति क्विंटल, तर मोहरीसाठी 200 रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. गहू आणि करडईसाठी प्रतिक्विंटल 150-150 रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय सातूसाठी प्रतिक्विंटल 115 रुपये आणि हरभऱ्यासाठी 105 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.
एमएसपी म्हणजे काय?
किमान आधारभूत किंमतही काही कृषी उत्पादनांसाठी सरकारने निर्धारित केलेली किमान किंमत आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या पिकाला खुल्या बाजारात योग्य भाव मिळत नसेल, तर त्या शेतकऱ्याला पिक विकायचे असेल, तर सरकार त्या शेतकऱ्याकडून एमएसपीवर पीक खरेदी करते.
याशिवाय एमएसपी हा शेतकर्यांच्या पिकांचा एक प्रकारचा विमा आहे, म्हणजेच सरकारने जी किंमत एमएसपी निश्चित केली आहे, आता त्या किमतीत सरकारला तुमच्याकडून पीक खरेदी करावे लागेल. मागणी आणि पुरवठा कमी करण्यासाठी सरकार एमएसपी आणते, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या पिकांसाठी किमान निश्चित किमान रक्कम मिळेल.