अकोला, दि.17: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सक्सेस यांच्यातर्फे इ.मा.व., वि.जा.भ.ज. व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट. सीएसआयआर नेट. एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. त्यातील 92 प्रशिक्षणार्थ्यांना एमएच सेट परीक्षेत यश मिळाले आहे.
लक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने नेट-सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. या प्रशिक्षणासाठी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यात पात्र ठरलेल्या 1 हजार 207 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ मिळाला. त्यापैकी 1 हजार 127 विद्यार्थ्यांना ऑफलाईन व 80 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातील 92 विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेत मिळवले आहे.
प्रशिक्षणार्थ्यांना शैक्षणिक, आवश्यक व आकस्मिक गरजांसाठी सहा महिने विद्यावेतन देण्यात आले. प्रशिक्षणात अध्ययनाबरोबरच त्यांच्याकडून विषयवार चर्चा, प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांत प्रियंका ठाकरे, परमेश्वर दास, वैभव कापसे, भुपेंद्र ढाले, महेश भांडे, भाविका शिंदे, अश्विनी वडे, उमेश पालवे, रिना चव्हाण, खुशवंत नाथे, विशाल आदमने, अपेक्षा गावंडे, विष्णू गोरे, मनिषा तोरकडे, विकास पिसे या व इतर विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, तसेच ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
एमएच सेट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत
‘महाज्योती’मुळे आई-वडलांचे स्वप्न साकार झाले
वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘महाज्योती’च्या युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. सुचनेनुसार अर्ज करुन प्रशिक्षणास पुणे येथे पाठवण्यात आले. सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत महाज्योतीकडून विद्यावेतन देण्यात आले. विद्यावेतनाने पुण्यात राहण्या, खाण्याची, शिक्षणाची, शैक्षणिक साहित्याची सोय करता आली. याआधारे सेट परीक्षा पास करता आली. आज मी कॉमर्स कॉलेजला सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाला लागलो. आई-वडीलांचे शिकून मोठा होण्याचे स्वप्न साकार झाले. आम्हा सार्यांचे स्वप्न महाज्योतीमुळे पूर्ण झाले.
–वैजनाथ भारत इडोळे, आडोळी, वाशीम.
‘महाज्योती’ मुळे गरीब विद्यार्थ्यांना संधी’
मी रसायनशास्त्र हा विषय घेऊन सेट पास झाले आहे. सेट परीक्षेत एक कॉमन आणि दुसरा वैकल्पिक विषय असतो. ‘महाज्योती’मुळे मला उत्तम प्रशिक्षण मिळाले. पुण्यातील प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्यावेतन मिळाले. राहण्या-खाण्याची, अभ्यासाची सोय झाली. माझ्यासह माझ्यासारखे बरेच विद्यार्थी सामान्य घरातून आले होते. ‘महाज्योती’ गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्याला शैक्षणिक, आर्थिक मदत करत आहे.
– प्रणिता जावळे, जळगाव.