अकोला,दि. 17: तलाठी व कोतवाल पदभरती सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षा उपकेंद्रांवर फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले असून, त्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी केला आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या आतील संपूर्ण परिसरात व बाहेरील लागून असलेल्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेत हा आदेश लागू राहील.
कोतवाल
पदभरतीसाठी परीक्षा 20 ऑगस्ट रोजी 12 उपकेंद्रांवर होईल. ही केंद्रे अशी : खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा (विजय हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रस्ता), जागृती विद्यालय (रणपिसेनगर), शिवाजी महाविद्यालय (मोर्णा इमारत, शिवाजी पार्क), श्रीमती एलआरटी वाणिज्य महाविद्यालय, रतनलाल प्लॉट (येथे दोन उपकेंद्रे आहेत.), सीताबाई कला महाविद्यालय (सिव्हिल लाईन रस्ता), भारत विद्यालय (तापडियानगर), दि नोएल इंग्लिश हायस्कूल (विभागीय एस.टी. कार्यशाळेमागे, कौलखेड रस्ता), भिकमचंद खंडेलवाल विद्यालय (गोडबोले प्लॉट, डाबकी रस्ता, जुने शहर), न्यू इंग्लिश हायस्कूल (रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या बाजूला), ज्युबिली इंग्लिश हायस्कूल (रामदासपेठ पोलीस ठाण्यानजिक), जी. एस. कॉन्व्हेंट (न्यू राधाकिसन प्लॉट, मुख्य टपाल कार्यालयामागे).
तलाठी
पदभरतीसाठी परीक्षा दोन उपकेंद्रांवर विविध तारखांना तीन सत्रांत घेण्यात येत आहे. त्याच्या तारखा दि. 17 ते 22 ऑगस्ट, दि. 26 ते 29 ऑगस्ट, दि. 31 ऑगस्ट, तसेच दि. 1 सप्टेंबर, दि. 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर, दि. 8 सप्टेंबर, दि. 10 सप्टेंबर, दि. 13 सप्टेंबर व दि. 14 सप्टेंबर अशा आहेत. तलाठी पदभरती परीक्षेसाठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बाभूळगाव, राष्ट्रीय महामार्ग क्र. 6, नागपूर रस्ता) आणि श्री इन्फोटेक (दत्तात्रय पेट्रोल पंपाजवळ, वैभव उपाहारगृहामागे, कापशी रस्ता) ही दोन उपकेंद्रे आहेत.
आदेशानुसार, परीक्षा केंद्रांच्या परिसरात पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्रित प्रवेश किंवा घोषणा देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात परीक्षार्थी किंवा अन्य व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल, असे कृत्य घडता कामा नये. अनधिकृत व्यक्ती व वाहनास मनाई आहे. उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सुविधा केंद्र, पान दुकान, टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेपक आदी परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. इंटरनेट, मोबाईल फोन आदी साधने घेऊन केंद्रावर प्रवेश करण्यास मनाई आहे.