चांगल्या आरोग्यासाठी विशेेषज्ञ नियमितपणे चालण्याचा सल्ला देत असतात. रोज चालल्याने अनेक आजारांचा धोका घटतो, असा निष्कर्ष अनेक संशोधनांत काढण्यात आला आहे. यापूर्वी रोज दहा हजार पावले चालल्याने अनेक आजार दूर पळतात, असा दावा करण्यात येत होता; पण नव्या संशोधनानुसार जर रोज एक ते दीड कि.मी. चालले तरी अनेक आजारांपासून सुटका होतेे. यासाठी केवळ 15 ते 20 मिनिटे चालणे पुरेसे आहे. चालणे हे एक चांगल्या प्रभावी औषधासारखे काम करते, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनात काढण्यात आला आहे.
युरोपीय जर्नल ऑफ प्रिव्हेंटिंग कार्डिओलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात तब्बल 2,26,889 लोकांच्या दिनचर्येचा अभ्यास केला गेला. नियमितपणे रोज चार हजार पावले चालल्याने हृदयासंबंधीचे आजार कमी होतात, असे स्पष्ट झाले. मात्र, जेवढे रोज चालता त्यात एक हजार पावलांची भर घातली, तर हृदयासंबंधीच्या आजाराने होणार्या मृत्यूची शक्यता सात टक्क्यांनी घटते. चालण्यात सातत्य राखल्यास त्याचा दुप्पट लाभ मिळतो, असेही संशोधकांनी स्पष्ट केले. पायी चालणे हे एका प्रभावी औषधासारखे काम करते, असा दावाही या संशोधनात करण्यात आला आहे.
संशोधनात असाही दावा करण्यात आला आहे की, रोज चार हजार पावले चालण्याने वरचा आणि खालचा दोन्ही ब्लडप्रेशर कमी होतात. तसेच तीन महिन्यांची सरासरी ब्लड शुगर म्हणजेच एचबीए 1 एसी खूपच कमी येते. चार हजार पावले चालण्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. जसे कॅन्सर, हार्टअॅटॅक आदीचा धोका कमी होतो.