कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून कामे वेळेत पूर्ण करा– जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 28 : जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम सेवा मिळवून देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असून, ही जबाबदारी ओळखून कामे पारदर्शकपणे व वेळेत पूर्ण करा, अशी सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज कार्यालयातील सर्व सहका-यांना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची बैठक जिल्हाधिका-यांनी आज नियोजन सभागृहात घेतली. अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल भालेराव, अनिल माचेवान, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे, अनिल चिंचोले यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, प्रशासनात काम करताना स्वयंशिस्त आवश्यक आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे. कुठलेही काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कार्यालयीन शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिक आपल्या कामांसाठी जिल्ह्यातून दुरदुरून कार्यालयात येत असतात. त्यांची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात विलंब किंवा ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही. आपण स्वत: नियमितपणे टेबल तपासणी करू, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संचिका सादर करताना त्यात नाव, पद, तारखेसह स्वयंस्पष्ट अभिप्राय असावेत. कामात पारदर्शकता ठेवावी. कार्यक्षमता वाढण्यासाठी कार्यालय स्वच्छ व वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या वातावरणाने काम करण्याचा उत्साह वाढतो. छोट्या छोट्या सुधारणांनी सकारात्मकता निर्माण होऊन कामांची गुणवत्ता वाढते. त्यादृष्टीने ‘सुंदर माझे कार्यालय’सारख्या संकल्पनाही राबविण्याचा विचार व्हावा. कर्मचा-यांच्या अडचणी असल्यास थेट आपल्याशी संवाद ठेवावा. एक कुटुंबप्रमुख म्हणून निश्चितपणे सहकार्य करू. परस्पर समन्वय ठेवून आपल्या सेवेची गुणवत्ता उंचावण्याचे आवाहन त्यांनी केले.