महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२२जुलै) सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली, याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून दिली आहे. त्यांनी या भेटीचे फाेटाेसह पंतप्रधानांशी झालेल्या संवादाचा तपशीलदेखील शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुटुंबातील व्यक्तींना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत, सदिच्छा भेटीला बोलावून प्रेमाने विचारपूस केली. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदेंसह त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे वडील, पत्नी, सून आणि नातू पीएम मोदी यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.
यावेळी पीएम मोदी यांनी महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले. दरम्यान पीएम मोदी यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत माहिती घेतली. तसेच रायगडमधील इर्शाळवाडीतील दुर्घटनेसंदर्भात सहवेदना व्यक्त करत बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईचा चेहरा बदलणारा प्रकल्प असल्याने, तो विनाअडथळा वेगाने पूर्ण करा. रखडलेले पुर्नविकास प्रकल्प त्वरित मार्गी लावा, असा सल्ला पीएम मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या भेटीदरम्यान दिला. कोकणातील पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजना याचीदेखील पीएम मोदी यांनी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही चर्चा केली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
आई होती…माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री भावुक
ज आमच्या चार पिढ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्या याचा मला निश्चितच आनंद आहे. आज माझी आई हवी होती असे मला आवर्जून वाटते आहे.माझे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंदी झाले आहेत,असेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. माझ्या वडिलांना आनंद झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचे ही त्यांचीही इच्छा होती.आज आमच्या चार पिढ्या एकत्र होत्या.पंतप्रधानांनी माझ्या नातवाबरोबरही गप्पा मारल्या आणि खेळले त्याचाही मला विशेष आनंद आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची संस्मरणीय भेट- डॉ.श्रीकांत शिंदे
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. आज आमच्या शिंदे परिवाराच्या चार पिढ्यांनी एकाचवेळी पीएम मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षण त्याच्या संवेदनशील ममत्वपणाची अनुभूती देऊन गेले. पीएम मोदी यांनी या भेटीदरम्यान मारलेल्या गप्पांनी आम्ही शिंदे परिवार भारावून गेले. पीएम मोदी यांनी आमच्या कुटुंबाचाच एक भाग होऊन संवाद साधतानाचा प्रसंग सर्वांसाठी आयुष्यभर जपावा असा सुवर्णक्षण ठरला. ही भेट म्हणजे देशाच्या राजकारणातील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची संस्मरणीय भेट ठरल्याचे देखील डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.